विनोद खन्नांच्या निधनानंतर "बाहुबली 2"चा भव्य प्रीमिअर रद्द
By Admin | Updated: April 27, 2017 14:45 IST2017-04-27T14:43:40+5:302017-04-27T14:45:48+5:30
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन झालं असल्या कारणाने हा प्रीमिअर रद्द करण्यात आल्याची माहिती करण जोहर यांनी दिली आहे

विनोद खन्नांच्या निधनानंतर "बाहुबली 2"चा भव्य प्रीमिअर रद्द
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - चाहत्यांना आतुरतेने प्रतिक्षा लागलेल्या बाहुबली 2 चित्रपटाचा भव्यदिव्य प्रीमिअर रद्द करण्यात आला आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन झालं असल्या कारणाने हा प्रीमिअर रद्द करण्यात आल्याची माहिती करण जोहर यांनी दिली आहे. करण जोहर यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रीमिअर रद्द झाल्याचं सांगितलं आहे. करण जोहर बाहुबली चित्रपटाचे निर्माते आहेत.
करण जोहर यांनी ट्विट करत सांगितलं की, "आपल्या सर्वांचे आवडते अभिनेते विनोद खन्ना यांच्या सन्मानार्थ बाहुबलीच्या संपुर्ण टीमने प्रीमिअर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे".
As a mark of respect to our beloved Vinod Khanna the entire team of Baahubali has decided to cancel the premiere tonight...— Karan Johar (@karanjohar) April 27, 2017
करण जोहर, एस ए राजामौली आणि बाहुबलीच्या संपुर्ण टीमने विनोद खन्नांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. "आमचे आवडते अभिनेते विनोद खन्ना आपल्यात नसल्याचं आम्हाला दुख: आहे. त्यांच्या निधनाने आम्हाला धक्का बसला आहे. आमच्या प्रिय दिवंगत अभिनेत्याच्या सन्मानार्थ बाहुबलीचा प्रीमिअर रद्द करण्यात येत आहे", असल्याचं बाहुबलीच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे.
आज रात्री बाहुबलीचा भव्यदिव्य प्रीमिअर होणार होता. यासाठी एक खास निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली होती. धर्मा प्रोडक्शनचे प्रमुख करण जोहर यांनी हे निमंत्रण पाठवलं होतं. अत्यंत आकर्षक स्वरुपात तयार करण्यात आलेली ही निमंत्रण पत्रिकाही चर्चेचा विषय झाली होती.