अभिनेत्री ममता कुलकर्णी केनियामध्ये पोलीसांच्या ताब्यात?
By Admin | Updated: November 13, 2014 13:47 IST2014-11-13T13:28:57+5:302014-11-13T13:47:17+5:30
बॉलीवूडमधील मराठमोळी अभिनेत्री ममता कुलकर्णीला केनियामधील पोलिसांनी अंमली पदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

अभिनेत्री ममता कुलकर्णी केनियामध्ये पोलीसांच्या ताब्यात?
ऑनलाइन लोकमत
नैरोबी, दि. १२ - बॉलीवूडमधील मराठमोळी अभिनेत्री ममता कुलकर्णीला केनियामधील पोलिसांनी अंमली पदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. ममताचा पती विजय उर्फ विक्की गोस्वामीला पोलिसांनी अटक केल्याचे स्पष्ट झाले असले तरी ममताला अटक झाली किंवा नाही याविषयी संभ्रम आहे.
नव्वदच्या दशकात बोल्ड दृष्यांमुळे चर्चेत आलेली ममता कुलकर्णीने बॉलीवूडला रामराम ठोकून ड्रग माफिया विजय उर्फ विक्की गोस्वामीशी लग्न केले होते. हे दोघेही सध्या नैरोबीत राहत होते. केनियातील अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थांची तस्करी करणारे एक मोठे रॅकेट उघड केले आहे. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली असून यात दोन स्थानिक ड्रग माफिया, विकी गोस्वामी आणि पाकिस्तानी वंशाच्या एका नागरिकाचा समावेश आहे. केनियातील स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार आणखी एका भारतीयाला याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे. मात्र पोलिसांनी अद्याप त्या व्यक्तीची माहिती जाहीर केलेली नाही. ही व्यक्ती ममता कुलकर्णी असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.