'दया' सेटवर सर्वांशी कशी वागायची? 'अय्यर'ने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाला- "मला आणि सोढीला तिने..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 16:27 IST2025-11-21T16:21:21+5:302025-11-21T16:27:38+5:30
दयाबेन फेम दिशा वकानीचं ऑफ स्क्रीन सेटवर वागणं कसं असायचं, याविषयी अय्यर फेम अभिनेते तनुज महाशब्देंनी खुलासा केला आहे. काय म्हणाले?

'दया' सेटवर सर्वांशी कशी वागायची? 'अय्यर'ने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाला- "मला आणि सोढीला तिने..."
लोकप्रिय टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) केवळ तिच्या कथानकामुळेच नव्हे, तर त्यातील कलाकारांमुळेही खूप चर्चेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून मालिकेत 'दया'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी शोमध्ये कधी परतणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. अखेर 'तारक मेहता' शोमध्ये अय्यरची भूमिका साकारणारे अभिनेते तनुज महाशब्देंनी 'दया'ची आठवण जागवली आहे.
अय्यर फेम अभिनेते तनुज महाशब्दे यांनी नुकतंच दिशा वकानीबद्दल काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. 'स्क्रीन'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, 'दिशासोबत त्यांचे संबंध आजही खूप चांगले आहेत आणि त्या त्यांच्यासाठी मोठ्या बहिणीसारख्या आहेत.'
'दया'विषयी 'अय्यर' काय म्हणाले?
तनुज महाशब्दे यांनी दिशा वकानीसोबतच्या बॉन्डिंगबद्दल बोलताना सांगितलं, "दिशा वकानी यांच्यासोबत माझं खूप चांगलं नातं होतं, आम्ही आजही एकमेकांच्या संपर्कात आहोत. ती माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखी आहे. जेव्हा माझ्या आईचं निधन झालं, तेव्हा तिने मला फोन करुन मला घरी बोलावलं. आमची खूप चांगली चर्चा झाली आणि ती जेव्हाही भेटते, तेव्हा प्रेमाने आणि आदराने भेटते. आम्हाला तिची खूप आठवण येते," असं तनुज यांनी सांगितले.
सेटवरील दिशा वकानी यांच्या स्वभावाबद्दल बोलताना तनुज म्हणाले की, "इतकी मोठी स्टार असूनही ती खूप नम्र आहे. दिशा सगळ्यांशी सारख्याच पद्धतीने वागायची. जी कलाकार मंडळी एकटी राहतात, त्यांची ती खूप काळजी घ्यायची. ती घरचं जेवण बनवून आणायची. गुरुचरण सिंह (सोढी) आणि मी अविवाहित असल्यामुळे, ती आमच्यासाठी जेवण घेऊन यायची. आधी ती आम्हाला नाश्ता केला की नाही हे विचारायची, मग बसवून जेवण वाढायची. ती खूप प्रेमळ आहे. दिशाला नेहमीच आनंद वाटायचा. खऱ्या आयुष्यातही ती तिच्या ऑन-स्क्रीन व्यक्तिरेखेसारखीच आहे."
२०१८ पासून शोमध्ये नाही परतली दिशा
दिशा वकानी २०१८ मध्ये प्रेग्नंसीमुळे मॅटर्निटी लिव्हवर गेली होती आणि तेव्हापासून ती शोमध्ये परतलेली नाही. काही महिन्यांपूर्वी शोचे निर्माते असित मोदी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, दिशाचे शोमध्ये परतणे आता कठीण आहे. मात्र, ते अजूनही सकारात्मक असून, "जर देवाने एखादा चमत्कार केला आणि ती परत आली, तर खूप चांगले होईल," असे त्यांनी म्हटले होते. पण जर दिशा परतली नाही, तर त्यांना शोमध्ये दुसरी 'दया बेन' आणावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.