...'हे' अभिनेतेही ठरले होते नसीर यांच्या टीकेचे बळी!

By Admin | Updated: July 26, 2016 13:25 IST2016-07-26T13:13:02+5:302016-07-26T13:25:52+5:30

अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी राजेश खन्नाप्रमाणेच अमिताभ बच्चन, सलमान खान, अनुपम खेर यांच्यावरही टीका केली होती.

... This actor was also the victim of Nasir's criticism! | ...'हे' अभिनेतेही ठरले होते नसीर यांच्या टीकेचे बळी!

...'हे' अभिनेतेही ठरले होते नसीर यांच्या टीकेचे बळी!

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ -  दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेता नसीरुद्दीन शहा टीकेचे धनी ठरले असून सामान्यांपासून बॉलिवूडमधील काही कलाकारांनीही त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी दर्शवली आहे. ' माझ्या नजरेत राजेश खन्ना हे साचेबद्ध, निकृष्ट अभिनेता होते' अशी टीका नसीर यांनी केली होती. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर चोहोबाजूंनी टीका होऊ लागल्यावर तसेच राजेश खन्ना यांची मुलगी व अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिनेही सडेतोड उत्तर दिल्यानंतर आपल्याला असे काही म्हणायचे नव्हते असे सांगत नसीर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 
दरम्यान इतर कलाकारांवर टीका करण्याची नसीर यांची ही काही पहिली वेळ नव्हे. यापूर्वीही त्यांनी अनेकवेळा चित्रपटसृष्टीतील कलाकारांवर टीकास्त्र सोडले होते. त्यामध्ये अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्तीपासून ते अनुपम खेरपर्यंत अनेक कलाकारांचा समावेश होता.
 
अमिताभ बच्चन : एका टीव्ही इंटरव्ह्यूदरम्यान नसीर यांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ यांच्यावर टीका केली होती. ' दिलीप कुमार हे चित्रपटसृष्टीतील (त्यांच्या) योगदानासाठी ओळखले जातील पण अमिताभ बच्चन नाही.. दिलीप कुमार हे एक श्रेष्ठ अभिनेते आहेत, पण ते त्यांच्या चित्रपट निवडीमुळे नव्हे. अमिताभ हे त्याच्या (चित्रपट)निवडीमुळे कधीच लक्षात राहणार नाही. तुम्ही कशाची निवड करता यातच तुमचं खर टॅलेन्ट आहे, असे नसीर यांनी म्हटले होते. 
 
 
फरहान अख्तर : 'फ्लाइंग सीख' अशी ओळख असणारे भारताचे धावपटू मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारित 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटात फरहान अख्तरने प्रमुख भूमिका केली होती. या चित्रपटाचे आणि फरहानच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. नसीर यांना मात्र हे पटले नव्हते. ' एखाद्या चित्रपटाची फोटोग्राफी उत्तम असली म्हणून काही तो चित्रपट उत्तम ठरत नाही. त्याचं एक उदाहरण म्हणजे, भाग मिल्खा भाग हा चित्रपट.. हा अतिशय चुकीचा, खोटा चित्रपट होता. या चित्रपटात त्या व्यक्तीचे (मिल्खा सिंग) चित्रण दाखवायला हवे होते. फरहानने मिल्खा सिंग यांच्याशी साधर्म्य दाखवण्यासाठी (चित्रपटासाठी) खूप मेहनत घेतली, पण तो मिल्खा सिंग न वाटता दुसराच कोणीतरी वाटत होता, अशा शब्दांत नसीर यांनी फरहानवर टीका केली. 
 
 
सलमान खान : उत्तर प्रदेशमधील 'सैफई' महोत्सवात माधुरी दीक्षित, वरूण धवन, आलिया भट्ट यांच्यासह  सलमान खानने परफॉर्मन्स दिला होता, त्यावरूनही नसीर यांनी सलमानवर टीका केली होती. ' आपल्याकडील या मोठ्या स्टार्सचे राजकारणाबाबत कोणतेही ठोस मत वा विचार नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये काय घडतय हे तुम्हाला (अभिनेत्यांना) दिसत नाही का? तरीही तुम्ही तिकडे (नाचायला) कसे जाऊ शकता? आणि तिथे मिळालेला पैसा कोणीही दान केला असेल असे मला बिलकूल वाटत नाही' असे सांगत नसीर यांनी अभिनेते व त्यांच्या सामाजिक बांधिलकीवर तोफ डागली होती. 
 
 
मिथुन चक्रवर्ती : नसीरुद्दीन शहा आणि मिथुन चक्रवर्ती यांनी 'हम पांच' आणि 'शिकारी' यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले होते. मात्र मिथुदांनी एका चित्रपटातील रोल नाकारल्यानंतर त्यासाठी नसीर यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी त्यावर खोचकपणे प्रत्युत्तर दिले होते. 'मिथुन त्याच्या नक्षली भूतकाळाबद्दल सतत बोलत असतो, मात्र त्यात किती सत्यता आहे, ते खरं आहे की नाही याबद्दल मला कल्पना नाही' असे त्यांनी म्हटले होते. 
 
 
अनुपम खेर : अनुपम खेर हे काश्मिरी पंडितांसाठी लढा देताना, खो-यातील त्यांच्या पुनर्वसनासाठी आवाज उठवत असताना त्याच मुद्यावरून शहा यांनी खेर यांच्यावर टीका केली होती. '  जे लोक व्यक्ती (खेर) कधीच काश्मिरमध्ये राहिले नाहीत, तेच आता काश्मिरी पंडितांसाठी लढा देताना दिसत आहे. आता अचानक ती व्यक्ती 'विस्थापित' बनली आहे.' अशी टीका त्यांनी केली होती. 
 
 
(कधीच काश्मीरमध्ये न राहिलेले देतायत काश्मिरी पंडितांसाठी लढा - नसीरुद्दीन शहांचा अनुपम खेरना टोला)
 

Web Title: ... This actor was also the victim of Nasir's criticism!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.