अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:52 IST2025-11-10T15:51:47+5:302025-11-10T15:52:47+5:30
धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असल्याचं कळत आहे.

अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्येत अस्वास्थ्यामुळे त्यांना चेकअपसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार आता त्यांची स्थिती गंभीर असल्याचं कळत आहे. धर्मेंद्र आयसीयूमध्ये असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य हे रुग्णालयातच आहेत. शिवाय त्यांची दोन्ही मुलींनाही अमेरिकेहून भारतात परत बोलवण्यात आलं आहे.
बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र हे चार्मिंग, हँडसम अभिनेते. वयाच्या ८९ व्या वर्षीही त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवणारा आहे. सध्या धर्मेंद्र यांची तब्येत नाजूक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे अशी माहिती मिळत आहे. अद्याप त्यांच्या कुटुंबियांकडून अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. काही दिवसांपूर्वी हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिलं होतं. त्यांनी पापाराझींना हात जोडून 'ठीक आहे' असं सांगितलं होतं.
यावर्षी एप्रिल महिन्यातच धर्मेंद्र यांच्या डोळ्यांची सर्जरी झाली होती. एका डोळ्यात धुसरपणा जाणवत असल्याने कॉर्निया ट्रान्सप्लांट करण्यात आलं होतं. याशिवाय मोतीबिंदूचंही ऑपरेशन झालं होतं. नंतर ते पुन्हा नव्या दमाने कॅमेऱ्यासमोर आले होते. आता ते रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असल्याने चाहते त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.