अभिनेता आयुष शाहने ठोकला ४.४४ कोटी रुपयांचा दावा, मायफ्लेज ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे संचालक बिश्वजीत घोष आणि प्रियाली चॅटर्जीवर फसवणुकीचा आरोप
By संजय घावरे | Updated: March 30, 2025 15:54 IST2025-03-30T15:47:48+5:302025-03-30T15:54:47+5:30
आयुश शाहने बिश्वजीत घोष, त्यांची पत्नी प्रियाली चॅटर्जी घोष, मायफ्लेज प्रायव्हेट लिमिटेड आणि शादाब हुसेन विरोधात खटला दाखल केला आहे.

अभिनेता आयुष शाहने ठोकला ४.४४ कोटी रुपयांचा दावा, मायफ्लेज ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे संचालक बिश्वजीत घोष आणि प्रियाली चॅटर्जीवर फसवणुकीचा आरोप
अभिनेता, जनसंपर्क फर्म मार्स कम्युनिकेट्सचे संस्थापक आणि उद्योजक आयुष शाह, बहीण मौसम शाह यांनी खोट्या बहाण्याने चार ते पाच वर्षांत घेतलेल्या ४.४४ कोटी रुपये कर्जाची परतफेड न केल्याबद्दल, मायफ्लेज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक, विश्वजीत घोष, पियाली चॅटर्जी घोष आणि शबाब हुसेन उर्फ शबाब हाशिम यांच्याविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम १३८ अंतर्गत फौजदारी खटला दाखल केला आहे.
संघर्षशील गायक विश्वजित घोष यांनी सुरुवातीला मनोरंजनाशी संबंधित कामासाठी आयुष शाह यांच्याशी संपर्क साधला. कालांतराने, त्यांनी आणि त्यांची पत्नी, पियाली चॅटर्जी घोष यांनी आयुष आणि मौसम यांच्याशी जवळीक निर्माण केली आणि त्यांच्या पीआर एजन्सीच्या कौशल्याचा फायदा घेतला. संपूर्ण भारतात पसरलेली विमान वाहतूक आणि व्यावसायिक प्रशिक्षण कंपनी मायफ्लेज प्रायव्हेट लिमिटेड भरभराटीला येत असल्याचा दावा करून, त्यांनी आयुष व मौसम या भावंडांना आर्थिक गुंतवणूकीसाठी तयार केले. गुंतवलेल्या पैशाचा वापर कंपनीचा विस्तार करण्यासाठी केला जाईल आणि त्या बदल्यात फायदेशीर परतावा मिळण्याचे आश्वासन दिले, परंतु पैसे परत मिळत नसल्याचे जाणवल्यानंतर आयुष-मौसम यांनी अखेर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. २२ मार्च रोजी त्यांनी बिश्वजीत घोष, त्यांची पत्नी प्रियाली चॅटर्जी घोष, मायफ्लेज प्रायव्हेट लिमिटेड आणि शादाब हुसेन विरोधात खटला दाखल केला आहे.
याबाबत अभिनेते आयुष शाह म्हणाले की, मूळचा भोपाळमधील असलेला गायक विश्वजीत घोष आणि त्यांची पत्नी प्रियाली चॅटर्जी घोष २०२०मध्ये आमच्या संपर्कात आले. त्यांच्या म्युझिक व्हिडिओच्या प्रमोशनच्या कामापासून आम्ही २०२१मध्ये सुरुवात केली. आमच्या ओळखीचा त्यांना चांगला फायदा झाला. माय फ्लेज ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दोघे मुलांना प्रशिक्षण देतात. या प्रशिक्षण केंद्रांमध्ये गुंतवणूकीसाठी त्यांनी आमच्याकडे पैशांची मागणी केली. आम्ही त्यांना फ्रेंचायजीज सुरू करण्यासाठी पैसे दिले. अशा प्रकारे त्यांनी सेंटर्स उघडण्यासाठी आमच्याकडून पैसे घेत राहिले. लखनऊ-मुंबईसह बऱ्याच ठिकाणी त्यांनी सेंटर्स सुरू केली. या दरम्यान आमच्याकडून ४.४४ कोटी रुपयांची रक्कम घेतली. त्या बदल्यात त्यांनी ३२ चेक दिले होते. यात त्यांचे वैयक्तीक, पत्नीचे आणि कंपनीच्या चेक्सचा समावेश आहे. डिसेंबर २०२४मध्ये २ कोटी रुपये परत करावे लागतील, या अटीवर पैसे देण्यात आले होते. त्यावर त्यांनी होकार दिला होता, पण पैसे परत द्यायची वेळ आली की आमच्याकडे आणखी पैसे मागायचे आणि तेच पैसे पुन्हा आम्हालाच परत द्यायचे. ही गोष्ट आमच्या लक्षात आल्याने पैसे देणे थांबवले. तिथून त्यांनी वाद सुरू केला आणि कॅाल घेणे बंद केले. विविध कारणे सांगून पैसे देणे टाळू लागले. त्यांनी बँकेचे फेक स्टेटमेंट्सही दाखवली. डिसेंबर २०२४ पासून आम्ही चेक बँकेत डिपॅाझिट करायला सुरुवात केली, तेव्हा चेक बाऊन्स झाले. त्यामुळे त्यांच्यावर गिरगाव कोर्टामध्ये ४.४४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा खटला त्यांच्यावर दाखल केल्याचेही आयुष यांनी सांगितले.