अबब, बिग बींकडून 51 लाख रुपयांचं दान
By Admin | Updated: February 8, 2017 22:36 IST2017-02-08T22:36:58+5:302017-02-08T22:36:58+5:30
अमिताभ बच्चन यांनी दिल्ली विद्यापीठातील आपल्या कॉलेजच्या सभागृहाच्या बांधकामासाठी 51 लाख रुपये देणगी स्वरूपात दिले

अबब, बिग बींकडून 51 लाख रुपयांचं दान
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी दिल्ली विद्यापीठातील आपल्या कॉलेजच्या सभागृहाच्या बांधकामासाठी 51 लाख रुपये देणगी स्वरूपात दिले आहेत. दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी अमिताभ बच्चन यांनी ही रक्कम दिल्याची माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून किरोरी मल कॉलेजच्या मोडकळीस आलेल्या सभागृहाच्या बांधकामासाठी निधी गोळा करण्यासाठी सतीश कौशिक आणि प्राध्यापक प्रयत्नशील होते.
अमिताभ बच्चन यांनी दिल्लीच्या किरोरी मल महाविद्यालयातच (केएमसी)शिक्षणाचे धडे गिरवले आहेत. केएमसी थिएटर सोसायटीमध्ये घडलेले अनेक अभिनेते आज बॉलिवूडमध्ये यशस्वी ठरले आहेत. मात्र मागील काही काळापासून केएमसीच्या आॅडिटोरिअमची दुरवस्था झाली होती. सप्टेंबर महिन्यात सतीश कौशिक यांनी आपल्या महाविद्यालयाला भेट दिल्यावर केएमसी आॅडिटोरिअमची झालेली दुरवस्था त्यांच्या लक्षात आली. तेव्हापासून या आॅडिटोरिअमच्या उभारणीसाठी त्यांनी येथील प्राध्यापकांना सोबत घेऊन प्रयत्न सुरू केले.
केएमसीचे प्रभारी प्राचार्य दिनेश खट्टर यांनी सतीश कौशिक यांच्या माध्यमातून या महाविद्यालयाचे अॅल्मुनी असलेले अमिताभ बच्चन, सुशांत सिंग आणि दिग्दर्शक अली अब्बास जफर, हबीब फैजल आणि विजय कृष्णा आचार्य यांची मुंबईत भेट घेतली. दिनेश खट्टर यांच्या नेतृत्वातील प्रतिनिधी मंडळाने केएमसीच्या आॅडिटोरिअमची झालेली दुरवस्था कलावंतांना दाखवली. या सर्व कलावंतांनी फ्रँक ठाकूरदास मेमोरिअल आॅडिटोरिअमच्या जीर्णोद्धारासाठी निधी देण्याचेही कबूल केले आहे.
आपल्या महाविद्यालयातील आॅडिटोरिअमच्या निर्मितीसाठी अमिताभ बच्चन यांनी तब्बल 51 लाख रुपये देणगी स्वरूपात देण्याचे जाहीर केले आहे. तसेच महाविद्यालयातून घडलेल्या अन्य कलावंतांनीही देणगी स्वरूपात मदत केली आहे, अशी घोषणा सतीश कौशिक यांनी मुंबईत केली.