आमीर खानच्या गाडीने दुचाकीस्वारास उडविले
By Admin | Updated: November 21, 2015 12:23 IST2015-11-21T02:10:26+5:302015-11-21T12:23:23+5:30
येथील खिंगर-राजपुरी रस्त्यावर जन्नीमाता मंदिराशेजारी अभिनेते आमीर खान याच्या आलिशान गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाला.

आमीर खानच्या गाडीने दुचाकीस्वारास उडविले
पाचगणी : येथील खिंगर-राजपुरी रस्त्यावर जन्नीमाता मंदिराशेजारी अभिनेते आमीर खान याच्या आलिशान गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७च्या सुमारास घडली. हा अपघात झाला त्या वेळी आमीर खानचा चालक अब्दुल रौफ खान हा गाडी चालवत होता, असे पोलिसांनी सांगितले.
शूटिंगच्या निमित्ताने आमीर खान पाचगणी येथे आला आहे. शुक्रवारी सायंकाळी ७च्या सुमारास आमीर राजपुरीहून पाचगणीकडे येत असताना त्याच्या गाडीने मनोज तुकाराम गोळे (४५) यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात गोळे गंभीर जखमी झाले. त्यांच्या पायाला, हाताला आणि तोंडाला मार लागला. आमीरच्या सहकाऱ्यांनी, तसेच नागरिकांनी गोळे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)
आमीरने घेतली गोळेंची भेट
जखमी गोळे यांना रुग्णालयात आणेपर्यंत धडक दिलेली गाडी कोणाची आहे, हे कोणालाच माहिती नव्हते. रुग्णालयात आमीर खान आल्यानंतर हे सर्वांना समजले.