'My friend's girlfriends', shuddha desi Marathi Bold Web series entertainment | 'स्त्रीलिंग पुलिंग' नंतर शुद्ध देसी मराठीची दुसरी धमाकेदार वेबसीरिज 'माझ्या मित्राची गर्लफ्रेन्ड'

'स्त्रीलिंग पुलिंग' नंतर शुद्ध देसी मराठीची दुसरी धमाकेदार वेबसीरिज 'माझ्या मित्राची गर्लफ्रेन्ड'

आपल्या पहिल्या-वाहिल्या सुपरहिट, दणकेबाज आणि सगळीकडे चर्चेचा विषय ठरलेल्या 'स्त्रीलिंग पुलिंग' या मराठीवेबसीरिजनंतर शुद्ध देसी मराठी त्यांची दुसरी धमाकेदार वेबसीरिज घेऊन येत आहे. यावेळीही तरुणांना आकर्षित करणारी, अधिक बोल्ड आणि  ऑऊट ऑफ द बॉक्स विषय असलेली 'माझ्या मित्राची गर्लफ्रेन्ड' ही वेबसीरिज ते घेऊन येत आहेत. अर्थात, नेटीझन्सही 'शुद्ध' मनाने या वेबसिरीजची वाट पाहात आहेतच.  

शुद्ध देसी मराठीची पहिली मराठी वेबसीरिज 'स्त्रीलिंग पुलिंग' आपल्या वेगळ्या विषयामुळे चांगलीच गाजली होती. इंटरनेटच्या जगतात तब्बल 1.5 कोटी नेटीझन्सने पाहिलेली अन् चाय पे चर्चासाठी घेतलेली ही वेबसीरिज डिजिटल मराठी मीडियात माईलस्टोन ठरली आहे.  या वेबसीरिजचे 6 एपिसोड प्रेक्षकांना बघायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा 6 एपिसोडचीच 'माझ्या मित्राची गर्लफ्रेन्ड' ही नवीन वेबसीरिज ते घेऊन येत आहेत. यातून मैत्री, रिलेशनशिप आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी लोक काय काय करतात, कसं कसं करतात हे सांगणारा विषय मजेदार पद्धतीने पाहायला मिळणार आहे. 

ही कथा आहे एका अप्पर मिडल क्लास वर्गातील 24 वर्षीय तरुणाची. तो कशाप्रकारे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या अडचणीत अडकतो. पण, तो त्यातून बाहेर कसा पडतो हा या कथानकातील सर्वात इंटरेस्टींग पार्ट आहे. शुद्ध देसी  स्टुडिओज या प्रोडक्शन हाऊसने या वेबसीरिजची निर्मिती केली असून यातून शार्दूल, सायली, गौरव आणि मेघा यांच्या बदलत जाणाऱ्या नात्यांची जुगलबंदी रंजकपणे दाखवण्यात आली आहे.

'माझ्या मित्राची गर्लफ्रेन्ड' या वेबसीरिची संकल्पना ही अलका शुक्ला यांची असून यात अक्षय म्हात्रे, रुचिरा जाधव, प्रसाद शिखरे आणि प्राजक्ता परब यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर या वेबसीरिजचं दिग्दर्शन देव खुबनानी आणि अंकुश मारोडे यांनी केलं आहे. 

तरुणाईची केमिस्ट्री, मेट्रो सिटीतलं लाईफ आणि युट्युबवरील सबस्क्राईब, असा कॉन्टेंट  मराठी प्रेक्षकांसाठी देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाचा आहे. मॉडर्न स्टाईलची देशी स्क्रीप्ट म्हणजे 'शुद्ध देसी मराठी' होय. नेटीझन्सचे 'लाईक' मिळालेली इंटरेस्टींग स्टोरी, 'कमेंट'चा वर्षाव करणारा रोमान्स आणि मित्रांसोबत 'शेअर' करावाच असा विनोदी ड्रामा, ही ओळखच शुद्ध देसी मराठीने डिजिटल दुनियेत क्रिएट केली आहे. त्यामुळे, आता उत्सुकता लागलीय ती, 'माझ्या मित्राची गर्लफ्रेन्ड' पाहायची.

Web Title: 'My friend's girlfriends', shuddha desi Marathi Bold Web series entertainment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.