भारतीय संघाने नुकतीच इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली. मालिकेत श्रेयस अय्यरने शानदार कामगिरी केली. त्याने तीन डावांमध्ये ६०.३३ च्या सरासरीने १८१ धावा केल्या. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. वनडे क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे श्रेयसला चॅम्पियन्स ट्रॉफी संघातही स्थान मिळाले.
भारत विजयाच्या आनंदात असला तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी संघात श्रेयस अय्यरच्या निवडीवर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचे एकमत नव्हते. टीओआयच्या वृत्तानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या संघ निवड बैठकीत गंभीर आणि आगरकर यांच्यात जोरदार वाद झाला.
दोघांमध्ये विकेटकीपिंग स्लॉटवरूनही वाद झाला. आगरकरला पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंतला प्राधान्य द्यायचे होते. त्याच वेळी, गंभीरने आधीच स्पष्ट केले होते की केएल राहुल हा भारताचा पहिला पसंतीचा यष्टीरक्षक असेल आणि संघ व्यवस्थापन त्यावर ठाम आहे. म्हणूनच राहुलने इंग्लंडविरुद्ध खेळला आणि पंत संघाबाहेर बसला.
अहवालात म्हटले आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफी संघाची घोषणा करताना, मुख्य निवडकर्ता अजित आगरकरने दावा केला होता की विकेटकीपर म्हणून ऋषभ पंत ही पहिली पसंती आहे, परंतु पंत हा संघातील एकमेव खेळाडू होता ज्याला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोणत्याही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु शेवटच्या क्षणी विराट कोहली तंदुरुस्त नसल्याने त्याला संघात घेतले. गंभीरने सांगितले होते की, श्रेयसला संपूर्ण मालिकेत बाहेर बसवण्याची योजना नाही. पण यशस्वी जैस्वालला वनडे पदार्पणाची संधी मिळावी म्हणून तो बाहेर बसणार होता.
जानेवारीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्राथमिक संघाची घोषणा करताना अजित आगरकर म्हणाला होता की, यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंत ही पहिली पसंती असेल. पण गौतम गंभीरचे मत यापेक्षा वेगळे होते. गंभीरने संकेत दिले आहेत की चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केएल राहुल विकेटकीपिंग करेल, तर पंतला संधीची वाट पहावी लागेल.