हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातील विजयासह यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली आहे. दुसरीकडे जेमिमासह दिल्ली कॅपिटल्सच्या संघाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात १९४ धावा करत दिल्ली कॅपिटल्सच्या संघासमोर १९६ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ १९ षटकात १४५ धावांवर ओटोपला.
जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ!
जेमिमा रॉड्रिग्स WPL मध्ये पहिल्यांदाच दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरली. मैदानात नाणेफेकीसाठी उतरल्यावर ती WPL मधील सर्वात युवा कर्णधार ठरली. पण सामन्यातील पराभवामुळे तिच्यावर पदार्पणात पराभव पत्करणारी कॅप्टन असा टॅग लागला. ती जीवलग मैत्रीण स्मृतीच्या क्लबमध्ये सामील झाली. WPL मध्ये कॅप्टन्सीच्या पदार्पणात पराभवाचा सामना करणारी ती स्मृती मानधना, स्नेह राणा, दीप्ती शर्मानंतर चौथी भारतीय कर्णधार ठरली. फक्त हरमनप्रीत कौर एकमेव भारतीय कर्णधार आहे जिने WPL मधील कॅप्टन्सीच्या पदार्पणात संघाला विजय मिळवून दिला होता.
दिल्ली कॅपिटल्स संघाचा WPL मधील सर्वात मोठा पराभव
एका बाजूला मुंबई इंडियन्सच्या संघाने प्रतिस्पर्धी संघाला सातव्यांदा ऑलआउट केले. दुसऱ्या बाजूला दिल्ली कॅपिटल्सच्या संघ सर्वाधिक सातव्यांदा ऑलऑउट झाला. एवढेच नाही तर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा WPL मधील हा सर्वात मोठा पराभव ठरला. याआधी २०२५ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सला यूपी वॉरियर्सच्या संघाने ३३ धावांनी पराभूत केले होते. आता मुंबई इंडियन्सने दिल्लीला ५० धावांनी शह दिला.