Virat Kohli Test Cricket Comeback: भारतीय संघाचा (Team India) स्टार फलंदाज विराट कोहली याने प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. गेल्या वर्षी अचानक रोहित शर्मा आणि पाठोपाठ विराट कोहली या दोघांनीही कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला. रोहित शर्मा कसोटीतील फॉर्ममुळे झुंजत होता. पण विराट मात्र चांगली कामगिरी करत होता. असे असतानाही विराटने हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. असे असताना आता विराट कोहली कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीतून माघार घेऊन पुन्हा कसोटी क्रिकेट खेळताना दिसू शकतो अशी चर्चा रंगली आहे.
विराट कोहली कसोटीत पुनरागमन करेल का?
विराट कोहलीच्या पुनरागमनाच्या वृत्तांबाबत, पत्रकार रोहित जुगलान यांनी असा दावा केला आहे की तो या वर्षी पुनरागमन करू शकतो, परंतु हे घडण्यासाठी गौतम गंभीरचे पदावरून पायउतार होणे आवश्यक आहे. रोहित जुगलान यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले की, गौतम गंभीर आणि विराट कोहलीमध्ये काही गोष्टींबाबत मतभेद आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्यात संवाद सुरू नव्हता. कदाचित ही कटुता विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे कारण आहे. जर विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये परत आणायचे असेल तर त्यासाठी नवा कसोटी प्रशिक्षक गरजेचा आहे. विराटच्या मनात कुठेतरी असा प्रश्न आहे की तो कसोटी क्रिकेटमधून खूप लवकर निवृत्त झाला आहे का? त्यामुळे विराट कोहली या वर्षी परत येऊ शकतो," असा दावा त्यांनी केला आहे.
कधी होऊ शकते पुनरागमन?
टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली २०२६ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो अशी चर्चा रंगली आहे. गौतम गंभीरने कसोटी प्रशिक्षकपद सोडले तर कोहली पुनरागमन करू शकतो, असे वृत्त आहे. काही वृत्तांमध्ये असा दावा केला आहे की कसोटी क्रिकेटमधील सततच्या अपयशांमुळे गौतम गंभीरचे प्रशिक्षकपद धोक्यात आले आहे. त्याच्या जागी दुसऱ्या अनुभवी क्रिकेटपटूची नियुक्ती केली जाऊ शकते. जर असे झाले तर विराट कोहली पुनरागमन करू शकतो.
गेल्या वर्षी झाला होता निवृत्त
गेल्या वर्षी १२ मे रोजी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. विराट कोहलीला कसोटी क्रिकेट सर्वात जास्त आवडायचे आणि या फॉरमॅटमधून बाहेर पडण्याच्या त्याच्या निर्णयाने चाहते आणि जाणकार दोघांनाही धक्का बसला होता. कोहलीने १२३ कसोटी सामन्यांमध्ये ९,२३० धावा केल्या, ज्यात ३० शतके आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची कसोटी कारकीर्द १४ वर्षांची होती आणि तो भारताच्या सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारांपैकी एक होता. आता, जर विराट पुनरागमन करू शकला तर तो कसोटी फॉरमॅटमध्ये १०,००० धावाही पूर्ण करू शकेल.
तर गौतम गंभीरची ताकद कमी होईल...
२०२६ च्या टी२० विश्वचषकाचा निकाल गौतम गंभीरची ताकद ठरवेल असाही दावा अहवालांमध्ये करण्यात आला आहे. जर भारताने टी-२० विश्वचषक जिंकला तर गंभीरची ताकद निश्चितच वाढेल, परंतु जर निकाल खराब राहिला तर महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत. तसेच अहवालात असेही म्हटले आहे की प्रग्यान ओझा मुख्य निवडकर्ता म्हणून अजित आगरकरची जागा घेऊ शकतो आणि माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल याचाही निवड समितीत समावेश होऊ शकेल.