टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील भारत-दक्षिण आफ्रिका या गत हंगामातील फायनलिस्टमध्ये रविवारी सुपर ८ फेरीतील सामना खेळवण्यात आला. हा सामना रंगतदार होईल, अशी अपेक्षा होती. पण पहिल्याच लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला. या पराभवासह ICC स्पर्धेत सलग १७ विजयानंतर भारतीय संघाचा दिमाखदार सिलसिला अखेर खंडित झाला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
कमालीचा योगायोग म्हणजे परदेशात वेगवेगळ्या मैदानांवर दबदबा दाखवणाऱ्या भारतीय संघाला घरच्या मैदानावर मात्र पुन्हा निराशा पदरी पडली. त्यामुळे जगातील सर्वात मोठं मानलं जाणारं नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) टीम इंडियासाठी खरंच अनलकी आहे का? हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
अभिषेक पुन्हा अपयशी, सुंदरचा प्रयोग फसला... 'ही' आहेत भारताच्या लाजिरवाण्या पराभवाची ५ कारणं
दिमाखदार कामगिरीनंतरही फायनलमध्ये अडखळली होती टीम इंडिया
आयसीसी वनडे वर्ल्ड कप (ICC Cricket World Cup 2023) स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अपराजित मोहीम राबवत १० सामने जिंकले आणि थेट फायनल गाठली. संपूर्ण स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखल्यानंतरही १९ नोव्हेंबर २०२३ रोजी याच मैदानावर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाकडून ६ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. त्या एका धक्क्याने करोडो चाहत्यांची स्वप्नं भंगली.
पुन्हा 'त्या' कटू आठवणींना उजाळा
आता आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ (ICC Men's T20 World Cup 2026) स्पर्धेतील सुपर ८ फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर पुन्हा २०२३ च्या 'त्या' कटू आठवणी ताज्या झाल्या. रोहित शर्मानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातही संघाने सलग १७ ICC विजय नोंदवत आपला दबदबा कायम ठेवला होता. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये ९ विजय, त्यानंतर २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीत ५ विजय अशा दणदणीत कामगिरीनंतरही अहमदाबादमध्ये पाऊल टाकताच विजयी लय खंडित झाली. त्यामुळे सोशल मीडियावरही हे मैदान टीम इंडियासाठी ‘पनौती’ असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. रोहित शर्मानंतर भारतीय संघाचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादव याचेही 'अच्छे दिन' इथं आल्यावर गायब झाले आहेत. अहमदाबादच्या या मैदानावर टीम इंडियाचं नशीब वारंवार दगा देतंय का? की हा फक्त योगायोग आहे? उत्तर काहीही असो, पण या पराभवाने जुन्या जखमा पुन्हा ठसठसू लागल्या आहेत.