Join us

INDW vs SAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

स्नेह राणानं आपल्या फिरकीच्या जोरावर सामना भारताच्या बाजूनं वळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 18:46 IST

Open in App

IND vs SA  Women’s ODI Tri-Series : प्रतिका रावल हिच्या दमदार अन् विक्रमी खेळीनंतर स्नेह राणा हिने आपल्या फिरकीची जादू दाखवत घेतलेल्या पाच विकेट्सच्या जोरावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला रोखत १५ धावांनी विजय नोंदवला. श्रीलंका-भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिरंगी वनडे मालिकेतील भारतीय संघाचा दुसरा सामना आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने  निर्धारित ५० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात २७६ धावा करत दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघासमोर २७७ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना ताझमिन ब्रिट्स (Tazmin Brits) हिने शतकी खेळी केली. पण तिची ही खेळी स्नेह राणाच्या जादुई फिरकीसमोर व्यर्थ ठरली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

प्रतिका रावल विक्रमी खेळी

 पहिल्यांदा फलंदाजी करताना सलामीची बॅटर प्रतिका रावल हिने संघाला दमदार सुरुवात करुन दिली. तिने ९१ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७८ धावा केल्या. या खेळीसह तिने वनडेत सर्वात जलद ५०० धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही आपल्या नावे केला. स्मृती मानधना हिने या सामन्यात ५४ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. या दोघींशिवाय हरलीन देओल २९ (४७), हरमनप्रीत कौर ४१ (४८)*, जेमिमा रॉड्रिग्ज ४१ (३२), रिचा घोष, २४ (१४), दिप्ती शर्मा ९ (८) आणि काशवी गौतम ५ (६)* यांनी संघासाठी उपयुक्त योगदाना दिले. 

भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!

मग पंजा मारत स्नेह राणानं फिरवला सामना

भारतीय महिला संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड (Laura Wolvaardt) आणि ताझमिन ब्रिट्स (Tazmin Brits) या दोघींनी दमदार सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. दोघींनी पहिल्या विकेटसाठी १४० धावांची भागीदारी रचली. दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना सहज जिंकेल, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना दिप्ती शर्मानं दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनच्या रुपात भारतीय संघाला पहिली विकेट मिळवून दिली. ताझमिन ब्रिट्स शतकी खेळीनंतर रिटायर्ट हर्ट होऊन तंबूत परतली. सेट बॅटर तंबूत गेल्याचा फायदा उठवत स्नेह राणानं सामना भारताच्या बाजूनं फिरवला. संघ अडचणीत असताना ताझमिन ब्रिट्स पुन्हा फलंदाजी करण्यासाठी आली. पण स्नेह राणानं तिला बाद करत विजयातील मोठा अडथळा दूर केला. स्नेह राणानं अर्धा संघ तंबूत धाडल्याचे पाहायला मिळाले.

टीम इंडिया गुणतालिकेत टॉपला

यजमान श्रीलंकेपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतीय संघ तिरंगी वनडे मालिकेतील गुणतालिकेत सर्वात आघाडीवर आहे. ४ मे रोजी भारतीय संघ पुन्हा एकदा श्रीलंकन संघाला भिडणार असून ७ मे रोजी भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आणखी एक लढत रंगल्याचे पाहायला मिळेल. गुणतालिकेत आघाडीचे दोन संघ ११ मेला फायनल खेळताना दिसतील. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरनमप्रीत कौरस्मृती मानधनाजेमिमा रॉड्रिग्ज