Smriti Mandhana Wedding Date: भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज स्मृती मंधाना सध्या महिला वनडे विश्वचषकात खेळत आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली आहे. तेथे त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा स्मृती मंधानाच्या बॅटमधून निघाल्यात. त्यामुळे तिच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे. त्यासोबतच स्मृती आणखी एका कारणाने चर्चेत आहे. ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आता स्मृती मंधाना आणि संगीतकार-पटकथाकार पलाश मुच्छल (Palash Mucchal) हे २० नोव्हेंबरला लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.
स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाबाबत टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, हे लग्न महाराष्ट्रातील सांगली येथे पार पडणार आहे. सांगली हे स्मृती मंधानाचे मूळ गाव असून, विवाहसोहळ्याचे काही कार्यक्रम २० नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. सध्या स्मृती भारतीय संघासोबत विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. परंतु, तिच्या घरी मात्र लग्नाची तयारी जोरात सुरू असल्याचे समजते.
कसं जुळलं प्रेम?
स्मृती आणि पलाश यांची ओळख २०१९ मध्ये झाली होती. दोघांनी आपल्या नात्याची अधिकृत कबुली गेल्या वर्षी सोशल मीडियावर दिली होती. पलाशने इंस्टाग्रामवर स्मृतीसोबत काही फोटो शेअर करत ‘५’ आणि हार्टचा इमोजीसह कॅप्शन दिले होते. ज्यावरून चाहत्यांना त्यांच्या प्रेमाबद्दल समजले.
पलाश मुच्छल कोण आहे?
३० वर्षीय पालाश मुच्छल हा प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलचा भाऊ आहे. त्याने ‘खेलेन हम जी जान से’ या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित चित्रपटात अभिनय केला असून, ‘Rickshaw’ या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे. सध्या तो ‘अर्ध’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. तो स्वत: संगीतकार आणि पटकथाकार आहे.