Join us

स्मृतीसह हरमनप्रीतचा फ्लॉप शो! ऑस्ट्रेलियासमोर भारतीय महिला संघ ठरला हतबल

ना कॅप्टन टिकली ना स्टार बॅटर आणि उप कॅप्टन स्मृती मानधनाला आपला जलवा दाखवता आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 17:01 IST

Open in App

Australia vs India Women 1st ODI: भारतीय महिला संघाची ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात एकदमच खराब झालीये. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियन संघानं भारतीय महिला संघाला ५ विकेट्स राखून पराभूत केले. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण तिचा हा निर्णय चांगलाच फसला. ना कॅप्टन टिकली ना स्टार बॅटर आणि उप कॅप्टन स्मृती मानधनाला आपला जलवा दाखवता आला. परिणामी भारतीय महिला संघाचा डाव निर्धारित ५० षटकांच्या आत म्हणजे ३४.२ षटकात १०० धावांत आटोपला.

ऑस्ट्रेलियन महिला संघाने घेतली आघाडी

ब्रिस्बेनच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने जेवढ्या धावा केल्या त्यापेक्षा कमी चेंडू खेळत ऑस्ट्रेलियन महिला संघाने  १६.२ षटकात ५ विकेट्स राखून विजय नोंदवला. या विजयासह यजमान संघाने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

स्मृतीसह प्रियाचा फ्लॉप शो

पहिल्यांदा बॅटिंग करताना स्मृती मानधना आणि प्रिया पुनिया या जोडीनं भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. स्मृती मानधनानं आपल्या भात्यातून सुरेख फटके दाखवून देत मोठी खेळी करण्यासाठी आतूर असल्याचे संकेत दिले. पण बाहेर जाणाऱ्या चेंडूवर ती फसली. ८ धावा करून तिने तंबूचा रस्ताधरला. तिच्या पाठोपाठ प्रिया पुनियानंही पॅव्हेलियनचा रस्ता धरला. तिने फक्त ३ धावा केल्या. 

हरमनप्रीत कौरनंही धरला नाही तग

अवघ्या १७ धावांवर भारतीय संघाची ओपनिंग जोडी माघारी फिरल्यावर कॅप्टन हरमनप्रीत कौरवर डाव सावरण्याची जबाबदारी येऊन पडली. हरलीन आणि हरमनप्रीत कौर जोडी जमतीये असं वाटत होते. पण त्या दोघींनी दुहेरी आकडा गाठला अन् त्यांचाही खेळ खल्लास झाला. हरलीन १९ धावा तर हरमनप्रीत कौर १७ धावांवर बाद झाली. त्यानंतर ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्या. भारतीय संघाने कसा बसा शंभरीचा आकडा गाठला होता.

ऑस्ट्रेलियन संघानं १७ व्या षटकातच जिंकला सामना 

भारतीय संघाने ठेवलेल्या १०१ धावांच्या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना फोबे लिचफील्ड आणि जॉर्जिया वॉल जोडीनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघींनी ७ व्या षटकात धावफलकावर ४८ धावा लावल्या. त्यानंतर रेणुका ठाकुरनं ऑस्ट्रेलियन महिला संघाला धक्क्यावर धक्के देत ३ विकेट घेतल्या. पण ते भारतीय संघाला विजय मिळवून देण्यासाठी  पुरेसे ठरले नाही. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर जॉर्जिया नाबाद ४६ धावा शेवटपर्यंत मैदानात टिकून राहिली. तिच्याशिवाय लिचफील्डनं ३५ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाहरनमप्रीत कौरस्मृती मानधना