ठळक मुद्देआयशा मुखर्जीनं शेअर केली भावूक Instagram Post.२०१२ मध्ये शिखर धवन, आयशा मुखर्जी यांचा झाला होता विवाह.
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर घवन (Shikhar Dhawan) आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी विभक्त झाल्याची (Divorce) माहिती समोर आली आहे. याची माहिती खुद्द आयशा मुखर्जीनं एक भावूक पोस्ट लिहीत दिली आहे. २०१२ मध्ये शिखर धवन आणि आयशा यांचा विवाह झाला होता. २०१४ मध्ये दोघांना पुत्ररत्नही झालं होतं. परंतु विवाहाच्या तब्बल ९ वर्षांनंतर त्यांच्या या निर्णयानं सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
"एकदा घटस्फोट झाल्यावर असं वाटलं की दुसऱ्यांदा बरंच काही धोक्यात आलं होतं, मला बरंच काही सिद्ध करायचं होतं. म्हणून जेव्हा माझं दुसरं लग्न मोडलं तेव्हा ते खूप भीतीदायक होतं. घटस्फोट हा वाईट शब्द असल्याचं मला वाटलं. दोनदा माझा घटस्फोट झाला. शब्दांचे अर्थ आणि त्यांचे संबंध कसे असू शकतात हे अतिशय मजेशीर आहे. मी पहिल्यांदा जेव्हा घटस्फोट घेतला तेव्हा खूप भीती वाटली होती. त्यावेळी अयशस्वी ठरल्याची भावना मनात आली आणि खुप काही चुकीचं करतेय असं वाटत होतं," असं आयशानं म्हटलं आहे.
मी सर्वांना निराश केलं असं मला वाटलं, स्वार्थी वाटलं आणि माझ्या पालकांना निराश केलं. माझ्या मुलांचा मी अपमान करत आहे अशी भावना मनात आली आणि काही प्रमाणात मला मी देवाचाही अपमान केला असल्याचंही वाटलं. घटस्फोट हा अतिशय वाईट शब्द होता," असंही तिनं आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहीलं आहे.
शिखर धवनकडून प्रतिक्रिया नाही
शिखर धवननं सध्या याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. अथवा त्याच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. यापूर्वी शिखर धवन आणि आयशा यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्याचं वृत्त समोर आलं होतं. इतकंच नाही, तर आयशानं शिखर धवनचे सर्व फोटो आपल्या फीडमधून डिलीट केले होते.