Palaash Mucchal propose Smriti Mandhana Video: वर्ल्ड चॅम्पियन उपकर्णधार स्मृती मंधाना रविवारी, २३ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार आहे. संगीतकार पलाश मुच्छाल याच्यासोबत ती सांगलीत विवाहबद्ध होणार आहे. त्याचदरम्यान, काल तिने अनोख्या पद्धतीने आपल्या साखरपुड्याची घोषणा केली. इंस्टाग्रामवर एक रील व्हिडीओ शेअर करत आपल्या टीम इंडियाच्या निवडक सहकाऱ्यांसोबत तिने साखरपुड्याची घोषणा केली. स्मृती मंधाना हिने आपल्या साखरपुड्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली त्यावेळी तिच्यासोबत जेमिमा रॉड्रिग्ज, श्रेयंका पाटील, राधा यादव आणि अरुंधती रेड्डी या चौघीही उपस्थित होत्या. 'लगे रहो मुन्ना भाई' या चित्रपटातील 'समझो हो ही गया' गाण्यासह एक उत्तम कोरिओग्राफ केलेले रील स्मृती आणि मित्रमंडळींनी शेअर केले आणि व्हिडीओच्या शेवटी साखरपुड्याची अंगठी कॅमेऱ्यासमोर धरली. त्याचदरम्यान, पलाशने आज स्मृतीला प्रपोज केल्याच्या दिवशीचा व्हिडीओ पोस्ट केला.
पलाशने स्मृतीला केलं प्रपोज
प्रपोज करण्याचा क्षण स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छाल या दोघांसाठी खास क्षण ठरला. सर्वात आधी पलाश स्मृतीच्या डोळ्याला पट्टी बांधून तिला डीवाय पाटील मैदानात नेले. त्यानंतर पलाशने इशारा करताच सर्व लाईट्स सुरू झाले. मग पलाशने तिला मैदानाच्या मधोमध नेले आणि मग तिला पट्टी काढायला सांगितली. तो क्षण खूपच भाऊक करणारा आणि आश्चर्यचकित करणारा होता. त्यानंतर पलाशने स्मृतीला गुडघ्यावर बसून प्रपोज केले. या वेळी त्यांचे काही मित्रमंडळीही उपस्थित होते. या प्रपोजलनंतर साऱ्यांनी एकच जल्लोष केला. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती आणि पलाश यांच्या २३ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या लग्नानिमित्त मंधाना आणि मुच्छाल कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी नवदाम्पत्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकांसोबत राहताना बळ मिळो, त्यांची स्वप्ने एकत्र गुंफली जावीत आणि त्यांचे जीवन आनंदी व समजूतदारपणाने भरलेले असावे, असे आशीर्वाद दिले. स्मृती आणि पलाश यांचा संसार विश्वास, प्रेम, जबाबदारी आणि एकमेकांवरील प्रेमाने भरलेला असावा. तसेच त्यांनी एकमेकांच्यात असलेल्या उणीवा स्वीकारून आपल्या वैवाहिक जीवनाची वाटचाल करावी, अशी सदिच्छा मोदी यांनी व्यक्त केली.