Jemimah Rodrigues Gautam Gambhir Stained Jersey Team India: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून पराभव केला. भारताच्या या विजयाची स्टार जेमिमा रॉड्रिग्ज होती. जेमिमा शेवटपर्यंत नाबाद राहिली. तिने भारताला ४८.३ षटकांत ५ बाद ३४१ अशी ऐतिहासिक मजल मारून दिली. जेमिमाने १३४ चेंडूत १४ चौकारांसह १२७ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. या खेळीसाठी जेमिमाला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. जेमिमाने केलेल्या खेळीनंतर भारतीय चाहत्यांना १४ वर्षांपूर्वीची गौतम गंभीरची खेळी अन् योगायोगाची आठवण झाली.
२०११ ते २०२५... गंभीर ते जेमिमा
जेमिमाच्या खेळीबद्दल खास गोष्ट म्हणजे तिने गौतम गंभीरच्या १४ वर्षांपूर्वीच्या झुंजार खेळीची आठवण करून दिली. २०२५च्या उपांत्य फेरीतील जेमिमाचा डाव २०११च्या पुरुष एकदिवसीय विश्वचषकात गौतम गंभीरने खेळलेल्या डावासारखाच होता. फक्त गंभीरची खेळी फायनलमधली होती. त्यावेळी गंभीरने ९७ धावा केल्या होत्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेमिमा आणि गंभीर दोघेही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आले होते. दोघांचीही खेळी मुंबईच्या मैदानावर झाली. गंभीर वानखेडेवर खेळला तर जेमिमा डीवाय पाटील मैदानावर खेळली. त्यात चाहत्यांना भावलेला योगायोग म्हणजे माखलेली जर्सी. जेमिमा आणि गंभीर दोघांनीही आपल्या इनिंगमध्ये जीव ओतून प्रयत्न केले होते. वेळप्रसंगी धाव घेताना डाइव्ह देखील मारल्या होत्या. त्यामुळे दोघांच्या जर्सी पुढच्या बाजूला माखलेल्या होत्या. दोघांच्याही जर्सीवर मातीचे डाग होते आणि त्यामुळेच भारतीय चाहते पुन्हा एकदा, 'डाग अच्छे होते है', म्हणताना दिसत आहेत.
![]()
गौतम गंभीरकडून भारताच्या महिला संघाचे कौतुक
भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून फायनल गाठल्यानंतर गौतम गंभीरने आपल्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट केली. गौतम गंभीरने दोन फोटो पोस्ट केले. पहिला भारतीय संघाच्या खेळाडूंचा एक फोटो पोस्ट केला, ज्यात सर्व महिला खेळाडू आनंदाने जल्लोष साजरा करत होत्या आणि मैदानावर खूप खुश दिसत होत्या. दुसऱ्या फोटोत त्याने जेमिमाचा माखलेल्या जर्सीतील फोटो पोस्ट केला. त्या फोटोत जेमिमाची उभी राहण्याची पद्धत पाहूनच समजते की कितीही आव्हाने आली तरी ती डगमगणार नाही. गंभीरने या पोस्टमध्ये एक संदेशही दिला आहे. त्याने लिहिले आहे की, जोवर खेळ संपत नाही, तोवर तुम्हीही मनातून खेळ संपला असं मानू नका, कारण शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकते. त्यासोबतच त्याने भारतीय महिला संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले.
जेमिमाची वडिलांना कडकडून मिठी...
भारताला विजय मिळवून दिल्यानंतर, जेमिमा रॉड्रिग्जचा एक व्हिडिओ समोर आला. त्यात वडिलांना मिठी मारताना आणि रडताना दिसली. व्हिडिओमध्ये दिसणारे अश्रू हे एका वडिलांच्या आणि त्यांच्या मुलीच्या आनंदाचे आणि समाधानाचे अश्रू आहेत. तिची सर्व स्वप्ने या अप्रतिम खेळीमुळे साकार होण्याकडे वाटचाल सुरू झाली. त्यामुळेच वडील आणि मुलगी दोघेही भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.