अवघ्या काही महिन्यांपूर्वी ज्याने आपल्या भेदक माऱ्याने जगातील दिग्गज फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले, तोच भारताचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह सध्या आयपीएलमध्ये स्वतःची लय शोधण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. टी-२० विश्वचषकात धुमाकूळ घालणारा बुमराह आयपीएलच्या मैदानात मात्र पूर्णपणे निष्प्रभ ठरला आहे. आ
आयपीएलच्या चालू हंगामातील बुमराहची आकडेवारी पाहता कोणाचाही विश्वास बसणार नाही. आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यांत १५ षटके गोलंदाजी करूनही बुमराहला एकही विकेट मिळवता आलेला नाही. या काळात त्याने १२३ धावा खर्च केल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट ८.२० राहिला आहे. ज्या गोलंदाजाची विकेट टेकिंग एबिलिटी ही त्याची ओळख होती, तोच गोलंदाज आज मैदानात संघर्ष करताना दिसत आहे. दरम्यान, बुमराहच्या खराब कामगिरीबद्दल क्रिकेट तज्ज्ञांनी आपली मत मांडली आहेत.
बुमराह आयपीएलमध्ये का ठरतोय अपयशी?
शारीरिक थकवा आणि युनिक ॲक्शन: बुमराहची गोलंदाजीची अॅक्शन अत्यंत वेगळी आहे. चेंडू टाकताना त्याच्या शरीरावर, विशेषतः पाठीवर आणि खांद्यावर प्रचंड ताण येतो. आंतरराष्ट्रीय सामने आणि त्यानंतर लगेच सुरू झालेल्या लीग क्रिकेटमुळे त्याच्या शरीराला रिकव्हरीसाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. थोडासा थकवाही त्याच्या अचूकतेवर मोठा परिणाम करत आहे, असे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.
वर्कलोड: बुमराहवर संघाची मोठी जबाबदारी असते. पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करताना येणारा प्रचंड मानसिक आणि शारीरिक दबाव त्याच्या कामगिरीवर परिणाम करत असावा. कामाच्या भाराचे योग्य व्यवस्थापन न झाल्याने त्याच्या लयीत व्यत्यय आल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फलंदाजांचा सराव: आधुनिक क्रिकेटमध्ये फलंदाज आता डेटाचा वापर करून बुमराहच्या यॉर्कर्सचा सराव करत आहेत. फलंदाजांनी आता त्याची गोलंदाजी अधिक चांगल्या प्रकारे वाचायला सुरुवात केली आहे. त्यातच बुमराहच्या स्वतःच्या लयीत थोडा बिघाड झाल्याचा फायदा फलंदाज घेत आहेत.