Suryakumar Yadav Flop Mumbai Indians IPL 2026: पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामातील अवस्था काहीशी विचित्र आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर सलग चार सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. या वाईट कामगिरीनंतर त्यांच्यावर सडकून टीका झाली. परिणामी सोमवारी गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्सचे दमदार पुनरामगन केले आणि ९९ धावांनी मोठा विजय मिळवला. संघाला विजय मिळाला असला तरीही संघाचा दमदार फलंदाज सूर्यकुमार यादवचा मात्र अद्यापही फ्लॉप शो सुरूच आहे. त्यामुळेच आता त्याची संघातील जागा धोक्यात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सूर्यकुमारचा धावांचा दुष्काळ; ६ सामन्यांत फक्त १२१ धावा
या हंगामात सूर्याची बॅट पूर्णपणे शांत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. आतापर्यंतच्या ६ सामन्यांत त्याने २०.१६ च्या सरासरीने केवळ १२१ धावा केल्या आहेत. सूर्यकुमारने दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध दमदार अर्धशतक ठोकले. पण त्याशिवाय इतर पाच सामन्यात तो फ्लॉप ठरला. कोलकाताविरूद्ध १६, राजस्थानविरूद्ध ६, बंगळुरूविरूद्ध ३३, पंजाबविरूद्ध ० आणि गुजरातविरूद्ध १५ धावा केल्या. सहापैकी पाच सामन्यात सूर्यकुमारला आपली छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे संघातील त्याच्या सहभागावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
निवडीवर प्रश्नचिन्ह की व्यवस्थापनाचा विश्वास?
सोशल मीडियावर सूर्याला प्लेइंग-११ मधून बाहेर काढण्याची मागणी जोर धरत आहे. तरीही मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनासाठी हा निर्णय घेणे सोपे नाही. याचे मुख्य कारण म्हणजे नुकत्याच मार्चमध्ये पार पडलेल्या टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये सूर्याच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी राहिलेला हा खेळाडू कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद ठेवतो, हे व्यवस्थापन जाणून आहे. शिवाय, सूर्याच्या मनगटाला झालेली दुखापत (Wrist Injury) पुन्हा उफाळून आल्याच्या चर्चा आहेत. त्याचा परिणाम त्याच्या शॉट सिलेक्शनवर होत असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. अशा परिस्थितीत त्याची संघातील जागा धोक्यात आली आहे.
पुढील वाटचाल कशी असेल?
मुंबई इंडियन्सचा इतिहास पाहता ते आपल्या बड्या खेळाडूंना फॉर्ममध्ये परतण्यासाठी पुरेसा वेळ देतात. परंतु, ६ पैकी ५ सामन्यात सूर्या फ्लॉप झाल्यामुळे आता त्याला काही काळ विश्रांती देण्याचा किंवा त्याच्या जागी नवीन पर्यायाचा विचार संघ व्यवस्थापन करू शकतो.