Indian Women's Cricket Team Meets PM Modi: वर्ल्डकप जिंकून इतिहास रचलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या छोरियांनी द. आफ्रिकेचा पराभव करत प्रथमच वनडे वर्ल्डकप जिंकला. सलग ३ पराभवानंतर सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगला उत्तर देत संघाने अप्रतिम पुनरागमन केले. तुम्ही फक्त ट्रॉफी जिंकली नाही, तर संपूर्ण देशाचे हृदय जिंकले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तर, २०१७ मध्ये आम्ही तुमची भेट घेतली होती, पण त्यावेळी आमच्या हातात ट्रॉफी नव्हती. यावेळी ट्रॉफी आहे. त्यामुळे आता तुम्हाला वारंवार भेटायला आवडेल!, अशी भावना कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केली.
भारतीय महिला क्रिकेट संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तेव्हा वातावरण भावनिक झाले. महिला विश्वचषक विजयानंतर पंतप्रधान मोदींनी महिला क्रिकेट संघाला त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले. यावेळी कोच अमोल मुझुमदार यांच्यासह अनेक खेळाडूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार भावुक झाले. अमोल मुझुमदार यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की, आम्ही दोन वर्षांपासून कठोर परिश्रम करत आहोत आणि अखेर हा दिवस आला आहे.
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या?
आम्ही गेली दोन वर्षे मेहनत करत होतो. टीममधील सगळ्यांनी कठोर परिश्रम घेतले. प्रत्येक सरावावेळी खेळाडूंनी कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्न केले. अतिशय उत्साहाने खेळाडू प्रत्यक्ष सामन्यांसाठी मैदानात उतरले. मेहनतीचे चीज झाले, असेच आता म्हणता येईल, असे अमोल मुझुमदार यांनी म्हटले आहे. तर, २०१७ रोजी आम्ही आपली भेट घेतली होती. परंतु, तेव्हा आमच्याकडे चषक नव्हता. परंतु, ज्या गोष्टीसाठी गेली काही वर्ष आम्ही मेहनत घेतली, ती साध्य झाली. विश्वचषक जिंकता आला. तुम्ही आमचा आनंद द्विगुणित केला. पुढेही वारंवार आपल्याला भेटायला आवडेल, असे कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितले.
दरम्यान, तुम्ही खेळाडूंनी खरोखरच उल्लेखनीय काम केले आहे. क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही, तर तो लोक जीवनाचा एक भाग बनला आहे. क्रिकेटमध्ये काही चांगले घडले तर संपूर्ण भारत देशाला चांगले वाटते; परंतु, इकडे-तिकडे काही झाले, तर देशाला दुःख होते. जेव्हा तुम्ही तीन सामने गमावले तेव्हा ट्रोलिंग आर्मी तुमच्या मागे लागली, असे पंतप्रधान मोदी यांनी खेळाडूंशी बोलताना सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, क्रांती गौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्याशी त्यांच्या वैयक्तिक कामगिरीबद्दलही चर्चा केली.