मुंबई इंडियन्सच्या संघाने १३ वर्षांनी आयपीएलच्या मोहिमेची सुरुवात विजयासह केली. पण त्यानंतर सलग चार सामन्यातील पराभवामुळे पाच वेळचा चॅम्पियन संघ गुणतालिकेत तळाला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ यंदा प्लेऑफ्समध्ये खेळेल का? असा प्रश्नही चर्चेचा विषय ठरत आहे. इथं जाणून घेऊया मुंबई इंडियन्ससाठी कसे असेल प्लेऑफ्सचे समीकरण त्यासंदर्भातील सविस्तर....
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाच वेळच्या चॅम्पियनचा पाच वर्षांचा दुष्काळ
मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी संघ आहे. पाच वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावणाऱ्या (२०१३, २०१५,२०१७, २०१९,२०२०) मुंबई इंडियन्सच्या संघाला मागील पाच हंगामात खास छाप सोडता आलेली नाही. यंदाच्या हंगामातील पास सामन्यातील चार पराभवामुळे मुंबई इंडियन्सचं काही खरं नाही, हार्दिकच्या जागी रोहित शर्माकडेच नेतृत्व हवे होते, अशी चर्चा रंगू लागली आहे. पण यंदाच्या प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकणे मुश्किल असले तरी अजूनही वेळ गेलेली नाही. यापेक्षा कठीण प्रसंगातून प्लेऑफ्स नव्हे तर फायनल गाठत मुंबई इंडियन्सने ट्रॉफी जिंकल्याचा रेकॉर्ड आहे. ही कसरत पुन्हा करायला लागू नये, यासाठी मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यासह पुढील सामन्यात सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नशील असेल.
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
प्लेऑफ्स मॅजिक फिगर अन् MI साठी स्पर्धेत टिकून राहण्याचे समीकरण
आयपीएल स्पर्धेत अगदी सुरक्षित प्लेऑफ्सची जागा पक्की करण्यासाठी किमान १६ गुण मिळवणं गरजेचे आहे. म्हणजे मुंबई इंडियन्सच्या संघाला उर्वरित ९ सामन्यात किमान ७ सामने जिंकावे लागतील. जर एक सामना अधिक जिंकला तर MI चं प्लेऑफ्समधील स्थान जवळपास निश्चित होईल.
एकूण ७ सामने जिंकल्यावरही प्लेऑफ्स आस राहिल, पण...
जर मुंबई इंडियन्सचा संघ उर्वरित ९ सामन्यांपैकी फक्त ६ सामने जिंकला तरी १४ गुणांसह ते प्लेऑफ्ससाठी पात्र ठरू शकतात. या परिस्थितीत अन्य संघांवर अवलंबून असेल. कोणत्याही संघाला हे समीकरण रुचणार नाही. MI चा संघही यात फसू नये, यासाठी जोर लावेल. मुंबई इंडियन्सच्या संघाला पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या अव्वल ४ मध्ये असलेल्या संघाविरुद्धही खेळायचे आहे. ही लढाई त्यांच्यासाठी सोपी नसेल. त्याआधी त्यांना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससमोर आपला रुबाब दाखवून द्यावा लागेल.