भारतीय संघातील विकेट किपर बॅटर संजू सॅमसन हा टी-२० क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करताना दिसतोय. आशिया कप स्पर्धेसाठी त्याची टीम इंडियात निवडही झालीये. पण तो प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल का? यासंदर्भातील चित्र अद्याप अस्पष्टच आहे. उप कर्णधारच्या रुपात शुबमन गिल पुन्हा संघात परतल्यामुळे संजूला सलामीला संधी मिळणं मुश्किल वाटते. यासंदर्भात आता टीम इंडियाचे माजी कोच आणि विद्यमान समालोचक रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केले आहे. आशिया कप स्पर्धेआधी त्यांनी कोच गौतम गंभीर आणि सूर्यकुमारला एक मोलाचा सल्ला दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...तर प्लेइंग इलेव्हनमधील स्थानही येईल धोक्यात
टी-२० वर्ल्ड कपनंतर संजू सॅमसन हा भारतीय संघातून सलामीवीराच्या रुपात खेळताना दिसत आहे. बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत सलामीवीराच्या रुपात १२ सामन्यात त्याने १८३.७० स्ट्राइक रेटसह ४१७ धावा कुटल्या आहेत. इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील कामगिरी सोडली तर त्याने खास छाप सोडलीये. जर शुबमन गिलला सलामीवीराच्या रुपात पहिली पसंती देण्यात आली तर संजू सॅमसनचं प्लेइंग इलेव्हनमधील स्थानही धोक्यात येईल. कारण लोअर मिडल ऑर्डरमध्ये जितेश शर्मासोबत त्याची टक्कर असेल.
Asia Cup साठी टीम इंडियात मिळाले नाही स्थान; नाराजीतही श्रेयस अय्यरनं दाखवला मनाचा मोठेपणा
संजू टॉप आर्डरमधील सर्वात खतरनाक बॅटर
एका बाजूला संजूसंदर्भात मोठा पेच निर्माण झाल्याचे दिसत असताना रवी शास्त्री यांनी सलामीवीराच्या रुपात त्यालाच पसंती दिलीये. संजू सॅमसन हा आघाडीच्या फलंदाजीतील खतरनाक फलंदाज आहे. त्यामुळे त्याच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये कोणताही बदल न करता त्याला सलामीलाच खेळवायला हवे. हे टीम इंडियाचे हिताचे ठरेल, असे मत रवी शास्त्रींनी व्यक्त केले आहे. शुबमन गिलला संघात घ्यायचं असेल तर त्याला दुसऱ्या कुणाच्या तरी जागेवर खेळवा, असा सल्ला शास्त्रींनी टीम इंडियाला दिला आहे.
सलामीची दावेदारी भक्कम करण्यासाठी लोकल लीगमध्येही धमाका
IPL च्या यंदाच्या हंगामात दुखापतीमुळे संजू सॅमसन बऱ्याच सामन्यांना मुकला. पण आशिया कप स्पर्धेआधी त्याने केरळा क्रिकेट लीगमध्ये धमाकेदार कामगिरी करून दाखवलीये. एका शतकासह सातत्यपूर्ण अर्धशतकी खेळीचा डाव खेळत त्याने आशिया कप स्पर्धेतील दावेदारी भक्कम केलीये. शास्त्रींनी त्याच्याकडून बॅटिंग केल्यावर टीम इंडियाचा कोच गंभीर ते गांभीर्यानं घेणार का? सूर्याही संजूच्या पाठिशी ठाम उभा राहणार का? ते पाहण्याजोगे असेल.