पुणे - टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज सलील अंकोला(Salil Ankola) सध्या मानसिक आजाराशी लढा देत आहे. पुण्यातील एका मानसिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ५८ वर्षीय अंकोला यांनी १९८९ साली पाकिस्तानविरोधात कराची कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकर यांच्यासोबत डेब्यू केले होते.
सलील अंकोला यांची पत्नी रिया अंकोला यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०२४ मध्ये आईच्या निधनानंतर सलील मानसिक तणावाखाली गेले. या दु:खातून त्यांना स्वत:ला सावरता आले नाही. सातत्याने ते चिंतेत राहायचे. त्यानंतर त्यांनी स्वत: उपचार घेण्याचा निर्णय घेतला. सलील यांनी वेळेआधीच ब्रेक घेत स्वत:ला सावरण्याचा निर्णय घेतला. सलील अंकोला यांच्या तब्येतील वेगाने सुधारणा होत आहे. ते नियमितपणे वर्क आऊट करत असल्याचे कुटुंबाने सांगितले.
तसेच क्रिकेट कायम त्यांचे पहिले प्रेम राहिले आहे. ते नेहमी फायटर आहेत. प्रत्येक संकटातून ते आधीपेक्षा जास्त मजबूत होऊन बाहेर पडलेत असंही पत्नी रिया यांनी मुलाखतीत म्हटलं. जवळपास २ दशकाआधी सलील अंकोला यांना दारूचे व्यसन जडले होते. त्यांच्यावर व्यसनमुक्ती केंद्रातही उपचार झाले होते. सध्या ते मानसिक आजाराने ग्रस्त आहेत परंतु त्याचा दारूशी काही संबंध नाही. कारण त्यांनी खूप आधीच दारू सोडली होती असं सांगण्यात येते. सलील अंकोला यांनी जानेवारी २०२३ ते ऑगस्ट २०२४ या काळात भारतीय टीमसाठी नॅशनल सेलेक्टर म्हणून भूमिका निभावली. त्याआधी २०२१ ते २०२३ या कालावधीत ते मुंबई क्रिकेट टीमचे चीफ सेलेक्टर राहिले होते.
'असं' होते क्रिकेट करिअर
सलील अंकोला यांच्या क्रिकेट करिअरबाबत सांगायचे झाल्यास त्यांनी १९८९ साली पाकिस्तानविरोधातील सामन्यात टीम इंडियात डेब्यू केले होते. कराची कसोटी सामन्यात त्यांनी दोन्ही डावात एक एक विकेट घेतली होती. मात्र त्यानंतर त्यांना पुन्हा कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही. काही आठवड्यांनी पाकिस्तानविरोधात वनडेमध्ये त्यांनी डेब्यू केले. भारतासाठी त्यांनी २० वन डे सामने खेळले त्यात १३ विकेट्स घेतल्या. घरगुती क्रिकेट सामन्यात त्यांचे रेकॉर्ड जबरदस्त राहिले. त्यांनी ५४ फर्स्ट क्लास सामन्यात १८१ विकेट्स आणि ७५ लिस्ट ए सामन्यात ७० विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे क्रिकेटनंतर सलील अंकोला यांनी फिल्मी क्षेत्रातही ओळख बनवली. त्यांनी सीआयडी या प्रसिद्ध मालिकेत काम केले त्याशिवाय अनेक सिनेमे आणि टीव्ही मालिकेत ते दिसले.