Shreyas Iyer : आशिया कप २०२५ स्पर्धेतून भारताचा मध्यफळीतील भरवशाचा बॅटर श्रेयस अय्यर टी-२० संघात कमबॅक करेल, अशी आशा होती. पण १५ सदस्यीय संघात सोडा राखीव ५ खेळाडूंच्या यादीतही त्याला स्थान मिळाले नाही. देशांतर्गत क्रिकेटसह आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यावरही श्रेयस अय्यर दुर्लक्षित झाला, अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. आता यावर श्रेयस अय्यरचे वडील संतोष अय्यर यांनी भाष्य केले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही त्याचा विचार झाला नाही, याचे आश्चर्य वाटते, असे ते म्हणाले आहेत. एवढेच नाहीतर त्यांनी श्रेयस अय्यरची अवस्था काय झालीये तेही सांगितलंय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!कॅप्टन करा म्हणत नाही, पण किमान संघात तरी घ्या!
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत संतोष अय्यर म्हणाले की, "टी-२० संघात स्थान मिळवण्यासाठी श्रेयसनं आणखी काय करायला पाहिजे तेच समजत नाही. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात त्याने चांगली कामगिरी केली आहे. दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्सच्या संघाकडून फलंदाजीसह नेतृत्वातील धमक दाखवली. त्याला भारतीय संघाचे कॅप्टन करा, असं म्हणत नाही. पण किमान संघात तरी स्थान द्या." अशा शब्दांत त्यांनी आपल्या लेकाला संघात न घेतल्याबद्दल खंत व्यक्त केली.
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
तो कधी बोलून दाखवणार नाही, पण...
श्रेयस अय्यर हा निराश झालाय, पण तो ते कधीच दाखवून देत नाही. संघात स्थान न दिल्याचा तो ना कधी राग काढतो ना नाराजी व्यक्त करतो. जे नशिबात होतं ते झालं असेच तो मानतो. तो शांत अन् धैर्यानं याकडे पाहत असला तरी मनात कुठंतरी तो दुखावला गेलाय, अशा शब्दांत त्याने लेकाच्या मनात काय सुरु असेल, ते सांगण्याचा प्रयत्न केलाय.
निवडकर्त्यांनी अय्यरचा विचार का नाही केला?
बीसीसीआय निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी भारतीय संघाची घोषणा केल्यावर संघात श्रेयस अय्यरला स्थान का नाही? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर आगरकर म्हणाले होते, की यात ना त्याची चूक आहे, ना आमची. सध्याच्या संघात त्याला कुणाच्या जागेवर घ्यायचं हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे त्याला आणखी काही काळ प्रतिक्षा करावी, लागेल असे ते म्हणाले होते.