IND vs SA T20 World Cup 2026 Match Harbhajan Singh Slammed Team India : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ च्या पहिल्याच लढतीत टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावल्यावर भारतीय संघातील उणीवा आणि संघ व्यवस्थापनाच्या निर्णयातील काही चुका चव्हाट्यावर आल्या आहेत. उप कर्णधार अक्षर पटेलला बाकावर बसवून वॉशिंग्टन सुंदरला संधी का दिली? हा मुद्दा सर्वाधिक चर्चेत आहे. यासंदर्भात हरभजन सिंगनं रोखठोक मत व्यक्त करताना कॉम्पुटरचा वापर करण्याऐवजी संघ व्यवस्थापनाने आपल्या बुद्धीचा वापर करावा, या धाटणीतील सल्ला दिला आहे. हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
ही गोष्ट समजण्यापलिकडची
माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीत उप कर्णधार असलेल्या अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा न मिळणं, हे समजण्यापलिकडचे कोडे आहे, असे म्हटले आहे. संघ व्यवस्थापनाने ‘मॅच-अप’च्या विचाराने वॉशिंग्टन सुंदरवर जो डाव खेळला तो सपशेल फोल ठरला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघावर ७६ धावांनी मोठ्या पराभवाची नामुष्की ओढावली.
आयसीसीच्या त्या एका नियमामुळे भारत सामना हरला? जादाचा एक खेळाडू सीमारेषेवर असता तर...
टीम इंडियानं जो 'सुंदर' डाव खेळला तो फसवा ठरला
भारतीय संघ व्यवस्थापनाने ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक, रायन रिकल्टन आणि डेविड मिलर या डावखुऱ्या फलंदाजांच्या फटकेबाजीला लगाम लावण्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याला पसंती दिली होती. पण जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने पॉवर प्लेमध्येच डी कॉक आणि रिकेल्टन दोघांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे सुरुवातीच्या षटकात वॉशिंग्टनचा प्रयोग करण्याची वेळच टीम इंडियावर आली नाही. मधल्या षटकात तो प्रभाव टाकू शकला नाही. त्यामुळे हा निर्णय फसवा ठरला. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरनं २ षटकांत १७ धावा खर्च केल्या, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. या १२ चेंडूत त्याने डेविड मिलरला फक्त चार चेंडूच टाकले. बढती देऊनही फलंदाजीतही तो टीम इंडियाच्या कामी आला नाही.
नेमकं काय म्हणाला हरभजन सिंग?
या मुद्यावर आपल्या युट्यूब चॅनेलवरील व्हिडिओमध्ये हरभजन सिंग म्हणाला म्हणाला आहे की, “तुम्ही वॉशिंग्टन सुंदरला खेळवण्यासाठी कोणाला बाहेर बसवले? तुमच्या उपकर्णधार अक्षर पटेलला. हा विचित्रच वाटतो. हे 'मॅच-अप्स' माझ्या समजण्यापलीकडचे आहे. कॉम्प्युटरवर आकडे दाखवले जातात, पण त्याला काही डोके-शेपटी नसते. केशव महाराजनं रिंकू सिंगची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. एवढेच नाही तर डावखुऱ्या शिवम दुबेच्यासमोरही उत्तम गोलंदाजी केली. दुबेनं त्याच्या प्रत्येक चेंडूवर षटकार मारला नाही? चांगला गोलंदाज कोणत्याही फलंदाजाला गोलंदाजी करू शकतो." हेच यातून दिसून येते. असे सांगत कॉम्पुटरवरील आकडेवारीनं 'मॅच अप्स' निर्णय घेण्याऐवजी संघ व्यवस्थापनातील मंडळींनी आपल्या बुद्धिमतेचा आणि अनुभवाचा वापर करुन सर्वोत्तम निर्णय घेणं अपेक्षित आहे. जे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनची निवड करताना झाले नाही, अशा धाटणीतील वक्तव्य करून हरभजन सिंगनं टीम इंडियाचीच फिरकी घेतली आहे.