IND vs AUS Women 2nd ODI: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने तुफान फलंदाजीचा नजराणा पेश केला. ब्रिस्बेनच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना जॉर्जिया वोल १०१ (८७) आणि एलिस पेरी १०५(७५) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन महिला संघाने निर्धारित ५० षटकात ८ बाद ३७१ धावा केल्या.
भारतीय फिरकीपटूच्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
या सामन्यात भारतीय ताफ्यातील २० वर्षीय फिरकीपटू प्रिया मिश्रा हिच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. प्रियानं या सामन्यात १० षटकांच्या कोट्यात एक विकेट्सच्या मोबदल्यात ८८ धावा खर्च केल्या. यासह प्रिया मिश्रा भारतीय महिला क्रिकेट संघाकडून वनडेत सर्वाधिक धावा खर्च करणारी गोलंदाज ठरली आहे.
प्रियाच्या आधी ११ वर्षांपूर्वी या भारतीय महिला गोलंदाजाने खर्च केल्या होत्या सर्वाधिक धावा
प्रिया मिश्राच्या आधी वनडेत सर्वाधिक धावा खर्च करण्याचा रेकॉर्ड हा गौहर सुल्ताना हिच्या नावे होता. २०१३ मध्ये तिने श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यात ७२ धावा खर्च केल्या होत्या. आता हा लाजिरवाणा रेकॉर्ड प्रियाच्या नावे जमा झाला आहे. महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा खर्च करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ती टॉप १० मध्ये सामील झाली आहे.
महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा खर्च करणाऱ्या भारतीय गोलंदाज
- प्रिया मिश्रा - ८८ धावा, विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०२४
- गौहर सुल्ताना - ७२ धावा विरुद्ध श्रीलंका, २०१३
- अमनजोत कौर - ७० धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०२४
- राधा यादव - ६९ धावा विरुद्ध न्यूझीलंड, २०२४