मराठवाड्यात भाजपने टाळला उद्धवसेनेशी थेट सामना ! अशा होतील लढती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 19:12 IST2024-04-06T13:06:42+5:302024-04-08T19:12:20+5:30
भाजपची तीन जागांवर काँग्रेसशी लढत; तर बीडमध्ये शरद पवारांच्या उमेदवाराशी गाठ

मराठवाड्यात भाजपने टाळला उद्धवसेनेशी थेट सामना ! अशा होतील लढती
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील लोकसभेच्या आठही मतदारसंघांतील लढतींचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. महायुतीत भाजप सर्वाधिक चार जागांवर लढणार असला तरी भाजपने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी थेट सामना टाळल्याचे दिसून येते. तीन जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे, तर बीडमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप लढणार आहे.
मराठवाड्यात लोकसभेचे आठ मतदारसंघ आहेत. जालना वगळता इतर मतदारसंघांतील उमेदवार निश्चित झाल्याने तेथील लढतींचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीत जालन्याची जागा काँग्रेसला सुटली असली तर काँग्रेसला अद्याप उमेदवार ठरविता आलेला नाही. ‘मविआ’त उद्धव सेनेकडे चार जागा आल्या असून काँग्रेस तीन, तर बीडची एकमेव जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडे गेली आहे.
पवार काका-पुतण्याकडे बीड आणि उस्मानाबाद
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकीत शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्या वाट्याला खूप कमी जागा आलेल्या आहेत. उस्मानाबादची जागा अजित पवार गटाकडे, तर बीडची जागा शरद पवार गटाला सुटली आहे. तिथे अनुक्रमे अर्चना पाटील आणि बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळाली आहे.
तीन ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस
मराठवाड्यातील आठ पैकी नांदेड, लातूर आणि जालना मतदारसंघात भाजपची लढत काँग्रेससोबत असेल, तर बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत.
अशा होतील लढती-
नांदेड : भाजप विरुद्ध काँग्रेस
लातूर : भाजप विरुद्ध काँग्रेस
जालना : भाजप विरुद्ध काँग्रेस
बीड : भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार)
हिंगोली : उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना
औरंगाबाद : उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना
उस्मानाबाद : उद्धवसेना विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार)
परभणी : उद्धवसेना विरुद्ध रासप
विद्यमान खासदार
भाजप : नांदेड, लातूर, बीड, जालना
उद्धवसेना : परभणी, उस्मानाबाद
शिंदेसेना : हिंगोली
एमआयएम : औरंगाबाद