Zerodha Nikhil Kamath: गेमिंग प्लॅटफॉर्म 'नाझारा टेक्नॉलॉजीज'च्या शेअर्समध्ये शुक्रवारी कमालीची तेजी पाहायला मिळाली. एका मोठ्या ब्लॉक डीलनंतर कंपनीचा शेअर तब्बल १८ टक्क्यांनी वधारला असून, त्यानं ३१४ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीला स्पर्श केला. या ब्लॉक डीलमध्ये कंपनीच्या ४.९% हिस्स्याची खरेदी-विक्री झाली असून झिरोदाचे को-फाउंडर निखिल कामथ यात खरेदीदार असल्याची चर्चा आहे.
सीएनबीसी-टीव्ही१८ च्या रिपोर्टनुसार, या ब्लॉक डीलमध्ये झिरोदाचे को-फाउंडर निखिल कामथ आणि कंपनीचे विद्यमान भागधारक 'अक्साना इस्टेट्स' हे प्रमुख खरेदीदार असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, कंपनीचे संस्थापक नीतीश मित्तरसैन यांनी या डीलमध्ये आपले शेअर्स विकल्याची माहिती समजतेय. मार्च तिमाहीच्या आकडेवारीनुसार, नीतीश मित्तरसैन यांच्याकडे २.१८% तर अक्साना इस्टेट्सकडे ५.४% हिस्सा होती.
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
चौथ्या तिमाहीत नफ्याचा उच्चांक
नाझारा टेक्नॉलॉजीजने आपल्या चौथ्या तिमाहीचे (Q4) आर्थिक निकाल जाहीर केले असून कंपनीच्या नफ्यात मोठी झेप दिसून आली आहे. कंपनीचा निव्वळ नफा तब्बल ६०८ टक्क्यांनी वाढून ४६.९६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ६.६३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. तर वार्षिक तत्त्वावर कंपनीच्या महसुलात मात्र १६.८ टक्क्यांची घट झाली असून तो ४४८.४७ कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षी ५३८.९१ कोटी रुपये होता. कंपनीचा एबिटा ३४.६ कोटी रुपयांवरून वाढून ७४ कोटी रुपये झाला आहे. तसेच एबिटा मार्जिनमध्येही सुधारणा झाली असून ते ६.७% वरून १८.६% वर पोहोचलेय.
नवीन कंपन्यांचं अधिग्रहण
चालू वर्षात नाझारा टेक्नॉलॉजीजनं 'ब्लू टाइल' आणि 'बेस्टप्ले' या कंपन्यांचे अधिग्रहण करून आपला पोर्टफोलियो अधिक मजबूत केला आहे. या अधिग्रहणामुळे कंपनीला कॅज्युअल मोबाईल गेमिंगशी संबंधित मालमत्ता मिळाल्या असून सुमारे २२ मिलियन मंथली अॅक्टिव्ह युजर्स कंपनीशी जोडले गेले आहेत. या अधिग्रहणांचा पूर्ण फायदा आर्थिक वर्ष २०२७ मधील कामगिरीत दिसून येईल, अशी अपेक्षा कंपनीनं व्यक्त केली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
