Sabyasachi Mukherjee Success Story: संकटातून मार्ग काढून नवी वाट शोधणारी व्यक्ती यशाची सर्वोच्च शिखरं पादाक्रांत करते, याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे सब्यसाची मुखर्जी. गेल्या वर्षी २५ जानेवारी रोजी सब्यसाची यांनी भारतीय फॅशन विश्वात आपली २५ वर्षे पूर्ण केली. कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक संकटांशी लढा देत त्यांनी एक यशस्वी आणि जगप्रसिद्ध फॅशन हाऊस उभं केलंय.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
आज त्यांचं नाव माहीत नसेल अशी क्वचितच एखादी व्यक्ती असेल. जगभरातील मोठे कलाकार, राजघराणी आणि नामवंत व्यक्ती त्यांच्या डिझाइन्सना पसंती देतात. त्यांची कथा ही केवळ संघर्षावर मात करण्याची यशोगाथा नाही, तर त्यांच्यातील महान कलाकाराचं दर्शन घडवणारी प्रेरणा आहे.
निर्वासित कुटुंब ते बालपणातील आर्थिक चणचण
सब्यसाची मुखर्जी यांचा जन्म १९७४ मध्ये कोलकाता येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील बांगलादेशातून आलेले निर्वासित होते. ताग उद्योगाची झालेली घसरण आणि प्लास्टिकचा वाढता वापर यामुळे त्यांच्या वडिलांची नोकरी गेली, ज्याचा कुटुंबावर मोठा परिणाम झाला. बालपणीची ही आर्थिक टंचाई त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनली. या परिस्थितीनंच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडले आणि त्यांच्या सर्जनशील विचारांना तसंच भविष्यातील कार्याला दिशा दिली. सब्यसाची लहानपणापासूनच अंतर्मुख स्वभावाचे होते आणि त्यांना कला व डिझाइनचं जग आवडायचं. कोलकात्याच्या समृद्ध इतिहासानं त्यांच्या कल्पनाशक्तीला अधिक बळ दिलं.
डिप्रेशनचा काळ आणि आत्महत्येचा विचार
शिक्षणाच्या प्रवासात सब्यसाची यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यांना पारंपरिक शिक्षणात फारसा रस नव्हता, म्हणून त्यांनी फॅशनची वेगळी वाट निवडली. अहमदाबादच्या प्रतिष्ठित 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन'मध्ये त्यांनी प्रवेश मिळवला, पण त्यांच्या अडचणी संपल्या नव्हत्या. आत्मविश्वासाची कमतरता, पैशांची चिंता आणि अपेक्षांचं ओझं हा त्यांच्या आयुष्यातला वाईट काळ होता, जिथे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याबद्दल बोलताना त्यांनी एकदा सांगितलं होतं की, डिप्रेशन हा आयुष्याचा वेदनादायक भाग असला तरी, त्यानं त्यांना जीवनाकडे पाहण्याची स्पष्टता आणि समज दिली, ज्यामुळे त्यांच्या सर्जनशील कामाला एक वेगळा उद्देश मिळाला.
सब्यसाची साम्राज्याचा जन्म आणि वैशिष्ट्ये
१९९० च्या दशकात जेव्हा भारतीय फॅशन इंडस्ट्री सुरुवातीच्या टप्प्यात होती, तेव्हा सब्यसाची यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. भारतीय वारसा आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम साधणाऱ्या त्यांच्या शैलीने त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवलं. १९९९ मध्ये त्यांनी कोलकात्यात आपला पहिला स्टुडिओ सुरू केला. पारंपारिक भारतीय वस्त्रांना आधुनिक रूप देण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे त्यांचे ब्रँड अल्पावधीतच लोकप्रिय झाले. विशेषतः त्यांच्या 'ब्राइडल कलेक्शन'नं मोठी खळबळ उडवून दिली. उत्कृष्ट कापड, बारीक नक्षीकाम आणि मोहक डिझाइन्समुळे भारतातील श्रीमंत वर्गाला त्यांच्या कपड्यांनी भुरळ घातली.
बॉलिवूडमधील प्रसिद्धी आणि ५०० कोटींची झेप
सब्यसाची यांच्या डिझाइन्सनी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनाही आकर्षित केले. अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण यांसारखे मोठे कलाकार त्यांचे नियमित ग्राहक बनले, ज्यामुळे त्यांचा ब्रँड प्रतिष्ठेचं प्रतीक बनला. २०२० पर्यंत सब्यसाची यांच्या कंपनीची उलाढाल २७५ कोटी रुपये होती. २०२१ मध्ये त्यांनी एक मोठं पाऊल उचलत आपल्या ब्रँडमधील ५१ टक्के हिस्सा आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडला ३९८ कोटी रुपयांना विकला. गेल्या वर्षी त्यांच्या कंपनीची अंदाजित उलाढाल ५०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. आता सब्यसाची आपल्या ब्रँडला जागतिक स्तरावर नेण्याचं स्वप्न पाहत असून, २०३० पर्यंत २ अब्ज डॉलर्सचं मूल्यांकन गाठण्याचं त्यांचं लक्ष्य आहे.
