ED On Online Gaming App Winzo: ऑनलाइन गेमिंग ॲप WinZo च्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ED) रविवारी WinZo आणि त्याच्या प्रवर्तकांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. कंपनीनं गेमच्या अल्गोरिदममध्ये फेरफार करण्यासाठी 'बॉट्स' आणि एआयचा (AI) वापर केल्यामुळे युझर्सनं ७३४ कोटी रुपये गमावल्याचा आरोप ईडीने केलाय. बंगळुरू प्रादेशिक कार्यालयानं २३ जानेवारी रोजी धनशोधन प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) स्थानिक न्यायालयात ही तक्रार दाखल केली.
आरोपींची नावं आणि कंपनीची व्याप्ती
या आरोपपत्रात विनझो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, तिचे संचालक पवन नंदा आणि सौम्या सिंह राठौर तसंच विनझो यूएस इंक, विनझो एसजी प्रायव्हेट लिमिटेड आणि झेडओ प्रायव्हेट लिमिटेड यांसारख्या परदेशातील उपकंपन्यांना आरोपी करण्यात आलं आहे. विनझो आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे १०० हून अधिक गेम्स चालवत होती. कंपनीचा दावा होता की त्यांचे सुमारे २५ कोटी युझर्स असून, त्यातील बहुतांश युझर्स हे छोट्या शहरांमधील होते.
अशा प्रकारे केला गैरव्यवहार
केंद्र सरकारन ऑगस्ट २०२५ मध्ये भारतातील 'रिअल मनी गेमिंग' ॲप्सवर बंदी घातली होती. ईडीनं सांगितले की, कंपनी युझर्सकडून त्याच्या रकमेचा ठराविक हिस्सा कमिशन म्हणून घेत असे. कंपनीने युझर्सना आश्वासन दिलं होतं की त्यांचे प्लॅटफॉर्म बॉट्सपासून मुक्त, पारदर्शक आणि सुरक्षित आहे. मात्र, तपासात असं आढळले की बहुतेक रिमोट मॅनेजमेंट सिस्टममध्ये (RMG) फेरफार करण्यात आला होता. गेम कोडबेस आणि अंतर्गत संवादाच्या विश्लेषणातून असे समोर आलं की, डिसेंबर २०२३ पर्यंत या गेम्समध्ये बॉट्स, एआय आणि अल्गोरिदम प्रोफाइल्स 'एम्बेडेड' करण्यात आले होते.
बनावट कंपन्यांद्वारे पैसे वळवले
आरोपपत्रानुसार, यातून कमावलेले पैसे अमेरिका आणि सिंगापूरमध्ये स्थापन केलेल्या बनावट कंपन्यांद्वारे वळवण्यात (Money Laundering) आले होते. ईडीनं गेल्या वर्षी विनझो आणि त्याच्या प्रवर्तकांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते आणि नंदा व राठौर यांना अटक केली होती. राठौर सध्या जामिनावर बाहेर आहेत.
