ठळक मुद्देझीनत यांनी उत्तर दिले की, “मी जेव्हा देवआनंद यांच्यासोबत ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटात काम केले होते. त्यावेळेच त्यांनी मला हे गोड नाव दिले होते. त्यानंतर सगळेच मला झीनी बेबी म्हणायला लागले.”

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर 3 हा शो सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा अत्यंत आवडता लहान मुलांचा डान्स रिअॅलिटी शो बनला आहे. यातील लहान मुलांच्या अद्भुत नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे आणि त्यामुळे तो टीआरपीमध्ये सतत आघाडीवर असतो. शिवाय दर आठवड्याला या कार्यक्रमात लोकप्रिय कलाकार स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी उपस्थिती लावत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम आणखीनच मनोरंजक होतो. येत्या आठवड्यात या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री बिंदू आणि झीनत अमान हजेरी लावणार आहेत. त्या स्पर्धक आणि परीक्षक शिल्पा शेट्टी, अनुराग बासू आणि गीता कपूर यांच्यासोबत मौज मस्ती करताना दिसणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान झीनत अमान यांनी देव आनंद आणि राज कपूर यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.


 
कोलकाताच्या सहा वर्षीय रूपसाने सत्यम शिवम सुंदरम चित्रपटातील ‘भोर भये पनघट पे’ गीतावर अद्भुत परफॉर्मन्स सादर केला. त्यावर झीनत अमान यांनी या गाण्याच्या चित्रीकरणाच्यावेळेसचा एक रंजक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, “हे गाणे एका गावात चित्रीत झाले होते. या गाण्यात मला रेतीमधून आणि खडबडीत रस्त्यावरून अनवाणी चालायचे होते. त्यामुळे राज कपूर यांनी गावातल्या बायकांना बोलावून रस्त्यातले दगडं आणि काटे दूर करायला सांगितले, जेणे करून मला अनवाणी चालताना त्रास होणार नाही. ते आपल्या कलाकारांची खूप काळजी घ्यायचे.” 

या गप्पा गोष्टी सुरू असताना रूपसाने झीनत अमान यांना विचारले की, त्यांची जवळची माणसे त्यांना झीनी बेबी अशी हाक का मारतात? त्यावर झीनत यांनी उत्तर दिले की, “मी जेव्हा देवआनंद यांच्यासोबत ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटात काम केले होते. त्यावेळेच त्यांनी मला हे गोड नाव दिले होते. त्यानंतर सगळेच मला झीनी बेबी म्हणायला लागले.”


 
सुपर डान्सर हा कार्यक्रम आता फिनालेच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. त्यामुळे चांगल्या डान्सरला मत देऊन त्याला ‘डान्स का कल’ हा किताब जिंकण्यात मदत करण्याची जबाबदारी आता प्रेक्षकांवर आली आहे. प्रेक्षक सोनीलिव्ह अॅप डाऊनलोड करून आपल्या आवडत्या स्पर्धकाला सुपर 5 मध्ये प्रवेश करण्यासाठी मत देऊ शकतात.


 
सुपर डान्सर ३ हा कार्यक्रम प्रेक्षकांना शनिवारी आणि रविवारी रात्री आठ वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळत आहे. 

Web Title: Zeenat Aman will always be Devanand's, 'Zinni Baby!' Revealed on Super Dancer Chapter 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.