बॉलिवूडमध्ये करण जोहर आणि कंगना राणौत यांच्यातील वाद कुणापासून लपलेले नाही. दोघांचे नाते अजिबात चांगले नाही. हे नाते आणखी खराब झाले जेव्हा बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा मुद्दा जोर धरू लागला. तेव्हापासून कंगना राणौत सातत्याने करण जोहरवर निशाणा साधत असते. काही दिवसांपूर्वी जेव्हा कार्तिक आर्यनला धर्मा प्रोडक्शनमधून बॅन करत असल्याचे जाहीर केले आणि त्याला दोस्ताना २मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तेव्हादेखील कंगना कार्तिकची बाजू घेत करणला खडेबोल सुनावले होते. करण आणि कंगनामधील हा वाद नवीन नाही. तर तो पूर्वीपासून चालत आला आहे. अगदी जेव्हा कंगनाने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला तेव्हापासूनच या वादाला सुरुवात झाली होती. कंगनाने पहिल्यापासूनच करणकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण स्वीकारले होते जे आजही कायम आहे.

कंगनाने २००६ साली रिलीज झालेल्या 'गँगस्टर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. या चित्रपटातील गाणीही लोकप्रिय ठरली होती. 'गँगस्टर' साठी कंगनाला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. याच अवॉर्ड फंक्शनमध्ये असे काही घडले की करण आणि कंगनामधील दरी आणखी वाढली.


या अवॉर्ड फंक्शनचे सूत्रसंचालन करण जोहर करत होता. त्याने मोठ्या प्रेमाने कंगनाला हा पुरस्कार घेण्यासाठी मंचावर बोलावले. या कार्यक्रमात कंगना खूपच नर्व्हस होती. इतकी की ती या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांशीही नीट बोलू शकली नाही. इतकेच नाही तर ती करणशीही काही बोलली नाही तिने पुरस्कार घेतला आणि ती निघून गेली. हे करणला आवडले नाही. कंगनाने त्याच्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे त्याचा चेहरा उतरला होता.

अर्थात या घटनेनंतर कंगनाने करणच्या 'उंगली' सिनेमात काम केले होते. मात्र यामध्ये कंगना मुख्य भूमिकेत नव्हती. त्यानंतर अनेकदा कंगनाने करणचे कौतुकही केले होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून हे कौतुक टीकेमध्ये रुपांतरीत झाले आहे.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, तिचा 'थलायवी' चित्रपट २३ एप्रिल रोजी रिलीज होणार होता. मात्र कोरोनाच्या संकटामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. हा चित्रपट तमिळनाडूच्या मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या जीवनावर आधारीत आहे. त्याचप्रमाणे 'तेजस' आणि 'धाकड' या सिनेमातही ती काम करत आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: VIDEO: Kangana Ranaut ignored Karan Johar at the event, producer's face was down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.