Jersey Movie Review: हरलेल्या बाबाच्या विजयाची कहाणी; जाणून घ्या कसा आहे शाहिदचा नवा सिनेमा 'जर्सी'!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 03:15 PM2022-04-22T15:15:32+5:302022-04-22T15:25:24+5:30

Jersey Movie Review: बाबूमोशाय, जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिए' हा राजेश खन्नाच्या 'आनंद' चित्रपटातील डायलॅाग या चित्रपटातील नायकासाठी अगदी चपखल बसतो.

Shahid kapoor and mrunal thakur starrer movie jersey review | Jersey Movie Review: हरलेल्या बाबाच्या विजयाची कहाणी; जाणून घ्या कसा आहे शाहिदचा नवा सिनेमा 'जर्सी'!

Jersey Movie Review: हरलेल्या बाबाच्या विजयाची कहाणी; जाणून घ्या कसा आहे शाहिदचा नवा सिनेमा 'जर्सी'!

googlenewsNext

कलाकार : शाहिद कपूर, मृणाल ठाकूर, पंकज कपूर, रोनित कर्मा, गीतिका मेहंद्रू, शिशीर शर्मा, रितुराज सिंह
लेखक - दिग्दर्शक - गौतम तिन्ननूरी
निर्माते -  दिल राजू, सूर्यदेवरा नागा वाम्सी, अमन गिल
शैली : स्पोर्टस ड्रामा
कालावधी : २ तास ५१ मिनिटे
दर्जा - तीन स्टार 
चित्रपट परीक्षण -  संजय घावरे

 

'बाबूमोशाय, जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिए' हा राजेश खन्नाच्या 'आनंद' चित्रपटातील डायलॅाग या चित्रपटातील नायकासाठी अगदी चपखल बसतो. क्रिकेटर बनून देशासाठी खेळण्याचं स्वप्नं खूप जण बघतात, पण त्यापैकी केवळ हाताच्या बोटांवर मोजणारेच यशस्वी होतात. मग इतरांचं काय होतं? या प्रश्नाचं उत्तर या चित्रपटाच्या नायकाची कहाणी पाहिल्यावर मिळू शकतं, पण जिद्द न हारता जो कठोर परिश्रम घेतो तो कधीच अपयशी ठरत नाही हे देखील यात पहायला मिळतं. वय वाढल्यामुळं हार न मानता स्वत:चं अस्तित्व सिद्ध करत जागतिक पातळीवरील बऱ्याच खेळाडूंनी वय हा आपल्यासाठी केवळ एक आकडा असल्याचं पटवून दिलं आहे. दिग्दर्शक गौतम तिन्ननूरी (Gowtam Tinnanuri) यांनी या चित्रपटात अशाच एका खेळाडूची कहाणी सादर केली आहे, जो नियतीपुढे हरलेला असला तरी प्रचंड जिद्दीनं पुन्हा विजयश्री खेचून आणतो आणि इतरांसाठी प्रेरणा बनतो.

पंजाब संघातर्फे रणजी ट्रॅाफीमध्ये विक्रमी खेळी खेळणारा तडाखेबाज फलंदाज अर्जुन तलवार, त्याची पत्नी विद्या, मुलगा किट्टू आणि क्रिकेटची कथा यात आहे. कारकिर्द ऐन बहरात असताना एक दिवस अचानक अर्जुन क्रिकेटला रामराम ठोकतो. करप्शनच्या आरोपामुळं नोकरी गेल्यानं बेकार असतो. वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकत क्रिकेटचे धडे गिरवणारा किट्टू वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून अर्जुनकडे भारतीय संघाची जर्सी मागतो, पण ती घेण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नसतात. अर्जुनची बरीच मानहानी होते. जर्सी खरेदी करण्यासाठी तो पुन्हा क्रिकेटही खेळतो, पण पैसे काही मिळत नाहीत. मग असिस्टंट कोच बनण्याच्या वयात तो मैदानावर उतरून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतो. त्याचा हा निर्णय किती सार्थ ठरतो त्याची कथा यात आहे. अर्जुनच्या करियर आणि जीवनाचा आलेख जर्सी नावाच्या पुस्तकात शब्दबद्ध केला जातो, पण अर्जुननं क्रिकेटला रामराम ठोकण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं सत्य पुस्तकातही नसतं, जे अखेरीस उलगडतं.

कथेचा प्लॅाट खूप चांगला आहे. क्रिकेट खेळण्याची इच्छा असूनही, क्षमता असूनही जे सिलेक्ट होत नाहीत त्या सर्वांची कथा या चित्रपटाच्या अनुषंगाने सादर करण्यात आली आहे. २०१९मध्ये याच शीर्षकाने प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. त्यामुळे गौतम यांनी हुबेहूब कॅापी मारली आहे. इतकी की मूळ चित्रपटात ज्या चुका केल्या त्यांची पुनरावृत्ती यातही केली आहे. आर्थिक विवंचनेत असलेल्या नायकाची परिस्थिती इतकी हालाखीची दाखवली गेलीय की, मुलासाठी जर्सी खरेदीसाठी त्याच्याकडे ५०० रुपयेही नाहीत, पण तो बुलेटवरून फिरतो, सिगरेट ओढतो. याचा कुठेतरी ताळमेळ घालणं गरजेचं होतं. पटकथा चांगली लिहिली गेली असली, तरी बांधणी आणखी घट्ट हवी होती. जेणेकरून चित्रपटाचा कालावधी कमी झाला असता. मध्यंतरापूर्वीच्या भागात वेग थोडा मंद वाटतो. पंजाबी बोलीभाषा आणि वातावरण निर्मिती छान केली आहे. एका हरलेल्या क्रिकेटरचं जीवन कसं असू शकतं याचं बोलकं चित्र सादर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. त्यातही प्रेम, खेळ, करियर, नोकरी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि स्वप्नांच्या चढ-उतारांचा आलेख पहायला मिळतो. क्रिकेटचे सामने छान शूट करण्यात आले आहेत. गीत-संगीत ठिकठाक आहे. कॅमेरावर्क आणि इतर तांत्रिक बाबीही  चांगल्या आहेत.

एका मॅच्युअर क्रिकेटरची भूमिका सर्वार्थाने यशस्वीपणे सादर करण्यासाठी शाहिद कपूर (Shahid Kapoor)ने घेतलेली मेहनत पडद्यावर जाणवते. क्रिकेटमधील अॅग्रेशन आणि संसारामधील संयम यांची त्यानं अचूकपणे सांगड घातली आहे. 'बाप बाप होता है' असंच जणू काही म्हणत पंकज कपूर (Pankaj kapoor)यांनी दमदार कोच साकारला आहे. संसाराच्या रहाटगाडग्यातही प्रेम टिकवून ठेवणारी पत्नी यात मृणाल ठाकूर (Mrunal Thakur)नं साकारली आहे. मृणालनं आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा ही भूमिका खूप वेगळी असून, तिनं तिला योग्य न्याय दिला आहे. इतर मुख्य कलाकारांना सहाय्यक भूमिकेतील कलाकारांची सुरेख साथ लाभली आहे. कोणतंही काम करण्यासाठी वय कधीच अडथळा ठरू शकत नाही हे सांगणारी हि गोष्ट आहे, जी कोणालाही प्रेरणादायी ठरू शकते. हि प्रेरणादायी कथा एकदा पहायला हरकत नाही.

Web Title: Shahid kapoor and mrunal thakur starrer movie jersey review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.