Ram Setu Movie Review : अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू

By संजय घावरे | Published: October 27, 2022 05:02 PM2022-10-27T17:02:54+5:302022-10-27T17:13:53+5:30

Ram Setu Movie Review : अक्षय कुमारच्या राम सेतूमधून सात हजार वर्षांनंतर आपल्याच पूर्वजांच्या इतिहासातील पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

Ram Setu Movie Review : Akshay Kumar Jacqueline Fernandez Nushrat Bharucha starrer Ram Setu Movie Review | Ram Setu Movie Review : अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू

Ram Setu Movie Review : अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू

googlenewsNext

कलाकार : अक्षय कुमार, नुसरत भरुचा, जॅकलिन फर्नांडिस, सत्यदेव कंचराणा, अंगद राज, जेनिफर पिकिनाटो, नस्सार, प्रवेश राणा, शुभम जयकर
दिग्दर्शक : अभिषेक शर्मा
निर्माते : अरुणा भाटीया, विक्रम मल्होत्रा
शैली : अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर
कालावधी : दोन तास २३ मिनिटे
स्टार : अडीच स्टार
चित्रपट परीक्षण : संजय घावरे

रामायणावर आजवर बरेच चित्रपट आणि मालिका बनल्या आहेत, पण रामायणातील एक महत्त्वाचा भाग असणाऱ्या राम सेतूवर चित्रपट बनवण्याची संकल्पना नावीन्यपूर्ण आहे. या निमित्तानं सात हजार वर्षांनंतर आपल्याच पूर्वजांच्या इतिहासातील पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांनी देखणं व्हिएफएक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साथीनं एक अशी गोष्ट सादर केली आहे, ज्याकडे फार कुणाचं लक्ष गेलेलं नाही.

कथानक : देव-धर्मापेक्षा वस्तुनिष्ठ पुराव्यांवर विश्वास ठेवणाऱ्या पुरातत्वशास्त्रज्ञ डॅा. आर्यन कुलश्रेष्ठच्या दृष्टिकोनातून कथानक सादर करण्यात आलं आहे. प्रभू श्री रामचंद्रांनी बांधलेला राम सेतू मानवनिर्मित नसून निसर्गनिर्मित असल्यानं त्याचा अडथळा दूर करण्यासाठी सरकारतर्फे न्यायालयीन लढाई सुरू असते. त्यात पुरातत्वशास्त्रज्ञ या नात्यानं आर्यनचा रिपोर्ट महत्त्वाचा असतो. यासाठी आर्यनसोबत डॅा. सँड्रा रिबेलो, डॅा. गॅब्रिएल या शास्त्रज्ञांची टिम सेतूचा अभ्यास करत असते. प्रभू श्री रामचंद्रांचं अस्तित्वच नाकारणाऱ्या आर्यनच्या हाती एक वस्तुनिष्ठ पुरावा लागतो, पण सेतू तोडण्याच्या बाजूने असणारे इंद्रकांत व बालीच्या तावडीतून सुटका करताना तो गहाळ होतो. श्रीलंकन सीमारेषेच्या पलीकडे गेलेल्या तिघांना या प्रवासात एपी नावाची अज्ञात व्यक्ती सहकार्य करते. त्यानंतर जे घडतं ते सिनेमात आहे.

लेखन-दिग्दर्शन : सुरेख वनलाईन असलेल्या कथानकवर याहीपेक्षा प्रभावी चित्रपट बनण्याची अपेक्षा होती. पटकथा आणखी रंजक हवी होती. मध्यंतरापूर्वी बराचसा भाग रेंगाळल्यासारखा वाटतो. आर्यनचा दृष्टिकोन दाखवण्यात बराच वेळ घालवला आहे. त्यामुळे राम सेतूचा मुद्दा यायला थोडा वेळ लागतो. मध्यंतरानंतर वेगात घटना घडतात आणि आता काय वेगळं पहायला मिळणार याबाबत कुतूहल वाढतं. विज्ञान आणि इतिहासाची सांगड चित्रपटात घालण्यात आली आहे, पण आध्यात्माचा मुद्दा बाजूलाच ठेवण्यात आला आहे. ग्रंथ आणि पुराणांमधील पुराव्यांचा आधार न घेता आज उपलब्ध असणाऱ्या पुराव्यांच्या आधारे दिग्दर्शकानं आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. श्रद्धा आणि पुरावे यांच्यातील लढाईत विजयी कोण होतं ते पहाणं उत्कंठावर्धक ठरतं. रामेश्वरमपासून श्रीलंकेपर्यंतची दृश्यं अतिशय मनमोहकरीत्या कॅमेऱ्यात टिपली आहेत. अंडरवॅाटर सिनेमॅटोग्राफीही छान झाली आहे. पुरातत्वशास्त्रज्ञाच्या गेटअपमध्ये अक्षय कुमार वेगळा दिसतो. व्हिएफएक्सही सुरेख आहेत. 

अभिनय : अक्षय कुमारनं साकारलेला आर्यन त्याच्या अगोदरच्या कॅरेक्टर्सपेक्षा खूप वेगळा आहे. दक्षिणात्य अभिनेता सत्यदेवनं छोटीशी पण महत्त्वपूर्ण असलेली चिरंजीवी हनुमंताची झलक दाखवणारी व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारली आहे. जॅकलिन फर्नांडीसनंही चांगलं काम केलं आहे. नुसरत भरूचाची जोडी अक्षयसोबत जमली असून, आर्यनच्या पत्नीची भूमिका तिनं कुठेही अतिशयोक्ती न करता साकारली आहे. नस्सार यांनी पुन्हा एकदा धूर्त व्यावसायिक रंगवला आहे. प्रवेश राणानंही खलनायकी भूमिकेत आपला ठसा उमटवला आहे.

सकारात्मक बाजू : सुरेख वनलाईन, दिग्दर्शन, अभिनय, व्हिएफएक्स, गेटअप
नकारात्मक बाजू : मध्यंतरापूर्वी संथ गती, पटकथा, काही गोष्टी समजून घ्याव्या लागणं
थोडक्यात : भगवान श्रीरामचंद्रांच्या जीवनकालातील महत्त्वाचा अध्याय सांगत आजही इतिहासाची साक्ष पटवून देत उभ्या असलेल्या राम सेतूवरील या चित्रपटात काही उणीवा असल्या तरी एकदा पाहण्याजोगा आहे.

Web Title: Ram Setu Movie Review : Akshay Kumar Jacqueline Fernandez Nushrat Bharucha starrer Ram Setu Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.