Hrithik Roshan's sister Sunaina says she supports Kangana Ranaut | हृतिक रोशनची बहीण सुनैनाने कंगना रनौतबाबत केले हे ट्वीट, वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का
हृतिक रोशनची बहीण सुनैनाने कंगना रनौतबाबत केले हे ट्वीट, वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

ठळक मुद्देसुनैनाने नुकतेच एक ट्वीट केले असून त्यात मी कंगनाला पाठिंबा देते असे लिहिले आहे तसेच या नराकात राहून मी आता कंटाळले आहे असे देखील तिने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

हृतिक रोशन आणि कंगना रणौत यांच्यातील वाद गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्याला ऐकायला मिळत आहे. हृतिकविरोधात बोलण्याची एकही संधी कंगना सोडत नाही. कंगना आणि तिची बहीण रंगोली मीडियात तसेच सोशल नेटवर्किंग साईटवर अनेकवेळा हृतिकविरोधात बोलताना दिसतात. पण कंगना आणि हृतिक यांच्या वादाला आता एक नवे वळण मिळाले आहे. कारण आता हृतिकची बहीण सुनैना रोशनने कंगनाला पाठिंबा दर्शवला आहे. 

सुनैनाने नुकतेच एक ट्वीट केले असून त्यात मी कंगनाला पाठिंबा देते असे लिहिले आहे तसेच या नराकात राहून मी आता कंटाळले आहे असे देखील तिने ट्वीटमध्ये म्हटले आहे. या ट्वीटवरून हृतिकच्या सतत विरोधात असणाऱ्या कंगनाला हृतिकची सख्खी बहीण सुनैना का पाठिंबा देत आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. 

कंगनाने देखील मुंबई मिररला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ती आणि सुनैना आजही एकमेकांच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. तिने या मुलाखतीत सांगितले होते की, मी आणि सुनैना यांच्यात नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध होते. तसेच त्यांच्या कुटुंबियांच्यादेखील मी खूप जवळची होती. पण ते आता ही गोष्ट मान्य करायला तयार नाहीयेत. सुनैना आजही माझ्या संपर्कात आहे. पण त्यांच्या घरात असलेल्या भांडणांचा मला फायदा घ्यायचा नाहीये. सुनैना माझी खूपच चांगली मैत्रीण आहे.

सुनैनाने गेल्या आठवड्यात एक ट्वीट केले होते. या ट्वीटवरून तिच्या आयुष्यात काहीतरी समस्या असल्याचे दिसून येत होते. याविषयी तिला पिंकव्हिलाने विचारले असता तिने सांगितले होते की, माझ्या कुटुंबामध्ये आणि माझ्यात काही तणाव आहेत. पण त्याच्याबद्दल मला बोलायचे नाहीये. मी काही दिवस दुसरीकडे देखील राहात होते. पण आता मी माझ्या आईवडिलांच्या घरी आले आहे. पण माझ्यासाठी घराचे प्रवेशद्वार वेगळे असून घरातील एक वेगळा फ्लोअर मला राहाण्यासाठी देण्यात आला आहे. हे खरे तर खूप वाईट आहे. पण माझ्या कुटुंबातील कोणीच माझ्याशी बोलत नाही की मला पाठिंबा देत नाही.  


Web Title: Hrithik Roshan's sister Sunaina says she supports Kangana Ranaut
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.