Flashback 2019 : या वर्षांत या कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 06:00 AM2019-12-28T06:00:00+5:302019-12-28T06:00:02+5:30

या कलाकारांमध्ये ज्येष्ठ कलाकारांसोबतच काही बालकलाकारांचा देखील समावेश आहे.

Flashback 2019 : bollywood celebrities who passed away in 2019 | Flashback 2019 : या वर्षांत या कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

Flashback 2019 : या वर्षांत या कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

googlenewsNext

2019 या वर्षांत अनेक प्रसिद्ध कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. यामध्ये ज्येष्ठ कलाकारांसोबतच काही बालकलाकारांचा देखील समावेश आहे.

कुशल पंजाबी

टीव्हीचा लोकप्रिय चेहरा कुशल पंजाबीने अवघ्या वयाच्या 37 व्या वर्षी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. कुशलने 27 डिसेंबरला  गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्स आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांना कुशलच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली आहे.

डॉ. श्रीराम लागू
‘कुणी घर देता का घर’ अशी आर्त विनवणी करीत रसिकांचे हृदय आपल्या अभिनयातून हेलावून टाकणारा रंगभूमीवरचा ‘नटसम्राट’17 डिसेंबरला काळाच्या पडद्याआड गेला. ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘हिमालयाची सावली’ ,‘सूर्य पाहिलेला माणूस’ अशी नाटकं तसेच चित्रपटातील एकसे बढकर एक दर्जेदार कलाकृतींमधून आपल्या समर्थ अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी केवळ मराठी इंडस्ट्रीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले होते.

विजू खोटे
वयाच्या ७८ व्या वर्षी गावदेवीतल्या राहत्या घरी विजू खोटे यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमारे ३०० हून अधिक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. शोले, अंदाज अपना अपना, अशी ही बनवाबनवी या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष लक्षात राहिल्या. तसेच जबान संभाल के या मालिकेतील त्यांची भूमिका देखील चांगलीच गाजली होती.

रमेश भाटकर
रमेश भाटकर यांचे 4 फेब्रुवारीला कर्करोगाने निधन झाले. रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम होते. त्यांनी रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'अश्रूंची झाली फूले' हे त्यांचे नाटक तर चांगलेच गाजले होते. तसेच त्यांची केव्हा तरी पहाटे, अखेर तू येशीलच, राहू केतू, मुक्ता यांसारखी अनेक नाटकं गाजली. १९७७ ला चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अष्टविनायक, दुनिया करी सलाम, आपली माणसं यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ते हिंदी चित्रपटांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

शौकत आझमी 
शौकत आझमी यांनी उमराव जान, बाजार, हिर रांझा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 2002 ला प्रदर्शित झालेला साथिया हा चित्रपट त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. शौकत आझमी यांचे पती प्रख्यात कवी कैफी आझमी होते तर शबाना आझमी या त्यांच्या कन्या होत्या.

चंपक जैन
चंपक जैन यांनी अनेक हिंदी चित्रपटांची निर्मिती केली होती. व्हिन्स रेकॉर्ड्स अँड टेप्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक होते. त्यांनी खिलाडी, बाजीगर, मैं खिलाडी तू अनारी, जोश, हमराज, हलचल यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांचे ब्रेन हॅम्रेजने 31 ऑक्टोबरला निधन झाले.

वीरू कृष्णन
वीरू कृष्णन हे प्रसिद्ध अभिनेते असण्यासोबतच डान्स ट्रेनर होते. आमिर खानच्या राजा हिंदुस्तानी या चित्रपटात त्यांनी काम केले होते. त्यांनी प्रियंका चोप्रा, अथिया शेट्टी, कतरिना कैफ यांसारख्या अभिनेत्रींना नृत्याचे धडे दिले आहेत. त्यांचे निधन 7 सप्टेंबरला झाले. 

मोहम्मद खय्याम
ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक खय्याम यांचे निधन 19 ऑगस्टला झाले. खय्याम यांच्या गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. नुरी, रझिया सुलतान, बाजार यांसारखे चित्रपट खय्याम यांच्याच संगीताने अजरामर झाले. 

विद्या सिन्हा
रजनिगंधा, छोटी छोटी बात, पती पत्नी और वो यांसारखे उत्कृष्ट चित्रपट बॉलिवूडला दिलेल्या अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे 15 ऑगस्टला निधन झाले. विद्या यांनी सलमान खानच्या बॉडीगार्ड या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात कमबॅक केला होता. त्यानंतर त्यांनी काव्यांजली, कबूल है, कुल्फी कुमार बाजेवाला, चंद्र नंदिनी यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले.

गिरीश कर्नाड
कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचं 10 जूनला निधन झाले. हिंदी, मल्याळम, तेलुगू, तमीळ, मराठी अशा 70हून अधिक चित्रपटांमध्ये गिरीश कर्नाड यांनी भूमिका साकारल्या. 1982 मध्ये जब्बार पटेल दिग्दर्शित ‘उंबरठा’ चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या पतीची त्यांनी केलेली भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली.

वीरू देवगण
वीरू देवगण यांचे २७ मेला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वीरू देवगण यांनी लाल बादशहा, इश्क, क्रांती, जान, हकीगत यांसारख्या ८० हून जास्त चित्रपटांत अ‍ॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केले. अभिनेता अजय देवगण हा त्यांचा मुलगा आहे.

राज कुमार बडजात्या
राज कुमार बडजात्या हे प्रसिद्ध निर्माते होते. त्यांनी हम आपके है कौन, हम साथ साथ है, विवाह यांसारखे चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्यांचे मुंबईत 21 फेब्रुवारीला हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

महेश आनंद
हिंदी चित्रपटसृष्टीत १९८० ते १९९० सालापर्यंत खलनायकाच्या भूमिकांतून रसिकांना भुरळ पाडणारे अभिनेते महेश आनंद यांचे 9 फेब्रुवारीला यारी रोड येथील राहत्या घरी निधन झाले. महेश आनंद यांनी शहेनशाह, मजबूर, स्वर्ग, थानेदार, विश्वात्मा, गुमराह, खुद्दार, बेताज बादशाह, विजेता आणि कुरुक्षेत्र या चित्रपटात काम केले होते.

शिवलेख सिंह
शिवलेख सिंहने ससुराल सिमर का, केसरी नंदन यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते. ऑक्टोबरमध्ये एका अपघातात त्याचे निधन झाले. तो केवळ 14 वर्षांचा होता. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये त्याच्या गाडीला अपघात झाला. त्याचे आई-वडील देखील त्याच्यासोबत होते. त्यांना दोघांना देखील यात दुखापत झाली होती.

सोहन चौहान
सोहन चौहानचे प्रेत मुंबईतील आरे येथील रॉयल पाम्स येथील तलावात सापडले होते. सोहनने इंडियाज गॉट टायलेंट, मास्टर शेफ इंडिया यांसारख्या कार्यक्रमाची निर्मिती केली होती. 


 

Web Title: Flashback 2019 : bollywood celebrities who passed away in 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.