आसाम आणि बिहारमध्ये पुराने कहर केला असून पूर आणि संबंधित दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ५५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मदतीसाठी चर्चेत असणारा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. त्याने आसाम मुख्यमंत्री सहायता निधी आणि काझीरंगा नॅशनल पार्कसाठी १-१ कोटी रुपये दिले आहेत. याबाबतची माहिती त्याने ट्विटरवर दिली आहे.

अक्षय कुमारने ट्विट केलं की, आसाममध्ये पुरामुळे प्रभावित झालेल्या लोकांची अवस्था पाहून मन हेलावून जात आहे. मनुष्य असो किंवा प्राणी, कठीण समयी सर्वांना मदत व सहकार्याची गरज असते. मी सीएम रिलीफ फंड आणि काझीरंगा पार्कच्या बचावासाठी १-१ कोटी रुपये दान करत आहे. त्याशिवाय लोकांना आवाहन करेन की त्यांनी महापुरामुळे प्रभावित झालेल्या लोक व प्राण्यांच्या मदतीसाठी पुढे यावे.
महापुरामुळे आतापर्यंत बिहार व आसाममधील ५५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय पावसामुळे घडलेल्या घटनांमुळे उत्तर प्रदेशमधील आतापर्यंत १४ लोकांचा बळी गेला आहे. काझीरंगा नॅशनल पार्कमधील अर्धा भाग पाण्याखाली गेला आहे. या ठिकाणी दुर्मिळ एक शिंगाचे गेंडे आढळले जातात. तिथल्या प्राण्यांचा जीव धोक्यात आहे.


अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो मिशन मंगल चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

याशिवाय हाऊसफुल ४, गुड न्यूज, लक्ष्मी बॉम्ब व सूर्यवंशी चित्रपटातही तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

यावर्षी त्याचा मिशन मंगलशिवाय हाऊसफुल ४ व गुड न्यूज प्रदर्शित होणार आहे.


Web Title: Akshay Kumar donates 2 crore to CM Relief Fund and Kaziranga after Assam floods
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.