Magh Purnima 2023: कुंडलीतले ग्रह तुमच्या यशाच्या आड येताहेत? माघी पौर्णिमेला आवर्जून करा 'हे' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 15:49 IST2023-02-04T15:49:02+5:302023-02-04T15:49:21+5:30
Magh Purnima 2023: माघ पौर्णिमेचे व्रत केले असता बत्तीस पट अधिक पुण्य मिळते, म्हणून तिचे महत्त्व जास्त. त्याबरोबरच ग्रहस्थिती अनुकूल होते, म्हणून पाळावे असे नियम-

Magh Purnima 2023: कुंडलीतले ग्रह तुमच्या यशाच्या आड येताहेत? माघी पौर्णिमेला आवर्जून करा 'हे' उपाय!
यंदा ५ फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमा येत आहे. तिला बत्तीशी पौर्णिमा असेही म्हणतात. कारण या दिवशी केलेल्या सत्कर्माचे पुण्य ३२ पट अधिक मिळते.. त्यामुळे दैनंदिन आयुष्य सुखावह होतेच, शिवाय ग्रहस्थिती अनुकूल होते. म्हणून ज्योतिष शास्त्राने माघ पौर्णिमेला काही नियम सांगितले आहेत, ते जाणून घ्या.
माघ मासात माघ स्नानाला फार महत्त्व असते. हे स्नान नदीवर जाऊन करणे आवश्यक असते. ते शक्य नसेल तर पौर्णिमेच्या सकाळी लवकर उठून अंघोळीचे पाणी अंगावर घेता घेता पवित्र नद्यांचे स्मरण करा. नुसत्या स्मरणानेही तुम्ही पापमुक्त व्हाल, असे त्या पवित्र नद्यांचे सामर्थ्य आहे. या उपायाने ग्रहदोष सौम्य होतात. ज्यांना शक्य असेल त्यांनी गंगास्नानाला प्राधान्य द्यावे, ज्यांना नाही त्यांनी गंगेचे स्मरणकरावे .
पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी, विष्णू आणि चंद्राची पूजा केली जाते, फुलं वाहून देवघर सुशोभित केले जाते. गंध, अक्षता वाहून स्तोत्रपठण केले जाते. या उपचारानंतर महत्त्वाचा असतो, तो म्हणजे दानधर्म! आपण देवाकडे नुसते मागून उपयोग नाही, यथाशक्ती दुसऱ्याला दान देण्याचीही आपली तयारी असली पाहिजे. अशा वेळी कोणत्या गोष्टींचे दान करावे ते जाणून घ्या.
- पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून सात धान्य दान केल्यास रवी दोष कमी होतो.
- साखर आणि तांदूळ यांचे दान चंद्र दोषासाठी चांगले असते.
- मंगल दोष निवारणासाठी हरभरा डाळ आणि गूळ दान केला जातो.
- बुध ग्रहाच्या दोषमुक्तीसाठीकेळी, करवंद आणि नारळाच्या तेलाचे दान शुभ ठरते.
- गुरू ग्रहाच्या अनुकूलतेसाठी गूळ, तूप किंवा पुस्तके गरजू मुलांना दान करावीत.
- शुक्रासाठी लोणी, पांढरे तीळ किंवा तीळ वडीचे दान करता येईल.
- शनिदेवासाठी काळे तीळ, तिळाचे तेल, लोखंडाचे भांडे आणि काळे वस्त्र दान करावे.
- राहूसाठी बूट-चप्पल, अन्न, वस्त्र गरजूंना दान करावे.
- केतूला प्रसन्न करण्यासाठी टोपी, घोंगडी दान करणे, दिव्यांगांना मदत करणे शुभ मानले जाते.
हे सगळे उपाय तुम्ही देखील सहज करू शकता. स्वछ मन, शुद्ध आचरण ठेवा, जेणेकरून तुमची ग्रहस्थिती बदलेल, मनस्थिती बदलेले आणि पर्यायी परिस्थितीही बदलेल.