Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाच्या दिवशी येतोय भद्राकाळ, या मुहूर्तावर चुकूनही बांधू नका राखी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 13:59 IST2022-07-15T13:58:44+5:302022-07-15T13:59:33+5:30
Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ वगळता कोणत्या शुभ मुहूर्तावर राखी बांधणे योग्य ठरेल, ते जाणून घ्या!

Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाच्या दिवशी येतोय भद्राकाळ, या मुहूर्तावर चुकूनही बांधू नका राखी!
श्रावण पौर्णिमेला आपण नारळी पौर्णिमा तसेच रक्षा बंधन हा सण साजरा करतो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात आणि त्याला दीर्घायुष्याची शुभेच्छा देतात. तर भाऊ आपल्या बहिणीला तिच्या रक्षणाची हमी देतो. हा सण भावा-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो. हा दिवस या पवित्र नात्याच्या दृष्टीने शुभ असला तरी पंचांगानुसार या दिवशी भद्राकाळ असणार आहे. त्यामुळे भद्राकाळाची वेळ वगळता आपल्याला रक्षा बंधन (Raksha Bandhan 2022) साजरे करता येईल. त्यासाठी आपण शुभ-अशुभ वेळेबद्दल जाणून घेऊ.
भद्राकाळ कशाला म्हणतात?
भद्राकाळ हा विनाशकारी काळ मानला जातो. पौराणिक कथेनुसार भद्रा ही सूर्य आणि छाया यांची कन्या आहे. या नात्याने भद्रा ही शनिदेवाची बहीण झाली. असे म्हणतात की जेव्हा भद्राचा जन्म झाला तेव्हा ती संपूर्ण विश्वाला गिळंकृत करणार होती. त्याचबरोबर हवन, यज्ञ, उपासना या शुभ कार्यात तिने अडथळे निर्माण केले होते. तेव्हापासून ती तिन्ही लोकांमध्ये शुभ कार्यात अडथळे घालण्यासाठी फिरत राहते. त्यामुळे तिच्या जन्मतिथीचा काळ अशुभ मानला जातो आणि तो भद्राकाळ म्हणून ओळखला जातो.
रक्षाबंधनाच्या दिवशी हा अशुभ योग येणार असल्याने तेवढा कालावधी वगळता रक्षाबंधन (Raksha Bandhan 2022) करावे असे ज्योतिषांनी म्हटले आहे. त्यादृष्टीने पुढील शुभ मुहूर्त जाणून घ्या आणि भद्राकाळ किती वेळ असेल तेही बघा.
रक्षाबंधन २०२२ शुभ मुहूर्त
रक्षाबंधन तारीख - ११ ऑगस्ट २०२२, गुरुवार
पौर्णिमा प्रारंभ - ११ ऑगस्ट, सकाळी १०. ३८ पासून
पौर्णिमा समाप्ती - १२ ऑगस्ट. सकाळी ७. ०५ मिनिटांनी
शुभ मुहूर्त - ११ ऑगस्ट सकाळी ९. २८ ते रात्री ९. १४ पर्यंत
अभिजीत मुहूर्त - दुपारी १२.६ ते १२. ५७ पर्यंत
अमृत काल- संध्याकाळी ६. ५५ ते ८. २० पर्यंत
ब्रह्म मुहूर्त - सकाळी ४.२९ ते पहाटे ५. १७ पर्यंत
भद्राकाळ - सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटांपासून रात्री ८.५१ मिनिटांपर्यंत
वरील माहितीनुसार भावंडांची वेळ ठरवून रक्षाबंधन (Raksha Bandhan 2022) निर्धास्तपणे साजरा करा आणि या पवित्र नात्याला आणखी घट्ट बनवा.