Capricorn characteristics : मकर रास म्हणजे शनी देवाची हक्काची रास; काय येते या राशीच्या वाट्याला? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 17:44 IST2022-05-30T17:43:21+5:302022-05-30T17:44:52+5:30

Capricorn characteristics : हुशार, काटकसरी, संयमी, सहनशील वृत्ती ही ओळख आहे मकर राशीच्या लोकांची!

Capricorn characteristics: Capricorn is Saturn's own place; let's know more about this zodiac sign! | Capricorn characteristics : मकर रास म्हणजे शनी देवाची हक्काची रास; काय येते या राशीच्या वाट्याला? जाणून घ्या!

Capricorn characteristics : मकर रास म्हणजे शनी देवाची हक्काची रास; काय येते या राशीच्या वाट्याला? जाणून घ्या!

आज शनी जयंती. योगायोगाने आज आपण ज्या राशीचे गुणधर्म जाणून घेणार आहोत ती रास म्हणजे मकर रास. शनी देव या राशीचे स्वामी आहेत. हे राशिस्थान शनी देवाचे हक्काचे स्थान आहे. त्यामुळे मकर राशीवरील लोकांवर शनी देवाची दृष्टी कायम असते. त्यामुळे होणारे फायदे तोटे जाणून घेऊ. 

मकर राशीचे लोक बुद्धिमान असतात. खाणे आणि गाणे हे त्यांचे आवडते प्रांत असतात.अर्थात अन्य विषयात त्यांचे करिअर असले तरी त्यांना खवय्येगिरी करण्यात आणि उत्तम संगीत ऐकण्यात विशेष रस असतो.ते मेहनती व प्रामाणिक असतात.त्यांच्या जीवनात अनेक संकटे येतात, पण ते धैर्याने सामोरे जातात आणि विजयीही होतात. पैशांची, नात्यांची ते किंमत जाणतात म्हणून दोन्ही गोष्टींचा यथायोग्य वापर करतात. 

मकर राशीचा स्थायीभाव आळशी असला तरी कामाच्या बाबतीत ते अचूक असतात. मात्र जेवढे काम तेवढा आराम हे त्यांचे गुणोत्तर ठरलेले असते. याबाबत ते थोडीही तडजोड करत नाहीत. त्यांना फिरायची प्रचंड आवड असते. भटकंती साठी ते कधीही तयार असतात. प्रवास करणे, माणसं जोडणे, लोकसंग्रह करणे आणि ठिकठिकाणच्या चटकदार पदार्थांचे सेवन करणे हे त्यांचे आवडीचे विषय असतात. 

मकर राशीच्या लोकांना पायाची दुखणी जास्त असतात. त्यांच्या कमरेखालचा भाग कमकुवत असतो. कमी वयातच गुडघे दुखी उद्भवते. हे लोक अति संवेदनशील असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अति विचार करून अति ताण ओढवून घेतात. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब इ आजार जडतात. यासाठी त्यांनी योगाभ्यास नियमित करावा आणि मन शांत ठेवून डोकंही शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. 

मकर राशीचे लोक अध्यात्मिक पिंडाचे असतात. त्यांना देवस्थान, तीर्थक्षेत्र, नित्य पूजा, जप-तप यात विशेष रस असतो. पारमार्थिक कार्यात हे अग्रेसर असतात. दान धर्म करतात. दुसऱ्यांना मदत करण्याची त्यांची उपजत वृत्ती असते. या गोष्टी शनी देवांना प्रिय असल्याने या राशीच्या लोकांना सगळ्या गोष्टी उशिराने का होईना पण मिळतात आणि आनंद देतात. 

प्रामाणिकपणा ही मकर राशीची ओळख आहे. हे लोक कर्तव्याप्रती सजग असतात. ते स्वतः प्रामाणिकपणे काम करतात आणि इतरांना प्रामाणिकपणे काम करायला भाग पाडतात. आपल्या धन्याशी इमाने इतबारे काम करतात. या लोकांना अनेक विषयांत रुची असली तरी एका विषयात ते पूर्ण यश संपादन करतात. या राशीच्या जातकांनी कोणाच्या सांगण्यावरून आपले कार्यक्षेत्र न निवडता आपल्या बुद्धीला व मनाला पटेल असे क्षेत्र निवडले तर त्यात ते उत्तम यश संपादित करतात. कर्क, तूळ, वृषभ, मकर, कुंभ या राशींचे एकमेकांशी चांगले सख्य असते. 

मकर राशीच्या लोकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत असतो. त्यांच्याकडे कला कौशल्य अधिक असल्याने ते सभा जिंकतात. त्यांच्याकडे वक्तृत्वकला चांगली असते. त्याचा ते सदुपयोग करतात आणि त्याच बळावर करिअर मध्येही पुढे जातात. या लोकांना भौतिक सुखाचे आकर्षण असते आणि ते अपेक्षित सुख स्वबळावर प्राप्तही करतात. संसार सुख सामान्य असते. शनी ग्रहामुळे संसारात थोडा विरक्त भाव दिसून येतो. 

मकर राशीचे लोक परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करतात त्यामुळे ते कोणातही सहज मिसळून जातात. पैशाच्या बाबतीत नेहमी काटकसर करतात. मकर राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रह नेहमीच फलदायी असतो, या राशीच्या लोकांनी हिरा धारण करावा. बुध हा भाग्याचा स्वामी आहे. जर बुध कुंडलीत योग्य स्थानावर असेल तर असे लोक खूप भाग्यवान असतात. या राशीच्या लोकांनी आपला आत्मविश्वास आणि मेहनत वाढवण्यासाठी नीलम रत्न धारण करावे. तसेच सूर्योपासना, मारुतीची तशीच शनी देवाची उपासना करावी. 

Web Title: Capricorn characteristics: Capricorn is Saturn's own place; let's know more about this zodiac sign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app