महापालिका निवडणूक: काँग्रेससोबत अकोल्यामध्ये आघाडी करणार का? प्रकाश आंबेडकरांनी मांडली रोखठोक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 09:58 IST2025-12-24T09:56:37+5:302025-12-24T09:58:31+5:30
अकोला महापालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे एकत्र लढणार की स्वबळावर मैदानात उतरणार, याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. त्यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका स्पष्ट केली.

महापालिका निवडणूक: काँग्रेससोबत अकोल्यामध्ये आघाडी करणार का? प्रकाश आंबेडकरांनी मांडली रोखठोक भूमिका
अकोला : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपला वगळून इतर राजकीय पक्षांसोबत राबविण्यात आलेला आघाडीचा फॉर्म्युला आगामी महापालिका निवडणुकीतही कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी दिले. मात्र, अकोल्यात काँग्रेसकडून अद्याप कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अकोला येथील यशवंत भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्थानिक पातळीवर आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील, असेही त्यांनी नमूद केले. अकोल्यातील तथाकथित तिसऱ्या आघाडीबाबत काही नेते भेटून गेल्याचा उल्लेख करत, प्रथम आघाडी तयार करा, त्यानंतर निर्णय घेऊ, असे त्यांना सांगितल्याचे आंबेडकर म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा हा सामान्य नागरिकांना परवडणारे कर, वीज, पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा तसेच उद्योग, व्यापार व कृषी उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनतेचे प्रश्न प्राधान्याने मांडले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहराचा विस्तार लक्षात घेता पाण्याचे नियोजन करणे अत्यावश्यक असून, काटेपूर्णा व दगडपारवा धरणातील पाण्याचा वापर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अकोलेकरांना दररोज वेळेवर पाणी मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
करांच्या माध्यमातून होणारी नागरिकांची लूट थांबविणे आवश्यक असून, महिलांसाठी इनडोअर स्टेडियम, ओपन थिएटर यांसारख्या सुविधांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. शहरात दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यावर योग्य प्रक्रिया केल्यास तो मोलाचा स्रोत ठरू शकतो. त्यासाठी शहराच्या चार भागांत कचरा प्रक्रिया व डम्पिंगची व्यवस्था असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मनपाला एजन्सी करून निधी मिळविता येतो!
महापालिका व जिल्हा परिषद या स्वायत्त संस्था असून, त्यांना एजन्सी म्हणून काम दिल्यास केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळू शकतो. एजन्सी म्हणून प्राधान्याने निधी उपलब्ध होतो.
महापालिकेकडे आवश्यक संसाधने असून, त्यामुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पातील तूट भरून काढता येऊ शकते, असे आंबेडकर म्हणाले.
मुंबई महापालिका स्वतंत्र असून, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात 'लाइव्ह स्टॉक' असल्याने त्यांना केंद्र किंवा राज्याच्या निधीची तितकी गरज भासत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याच धर्तीवर अकोला महापालिकेचा विकास करण्यास वाव असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.
विमानतळ धावपट्टीचा प्रश्न लवकरच मार्गी
शिवणी विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून, त्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध झाल्यास व्यवसाय व उद्योगांना चालना मिळेल.
सध्या येथील तरुण बाहेर जाण्याऐवजी डाळ, कापूस व शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्याला प्राधान्य देत आहेत, असे त्यांनी सांगितले. देशात कापसाचा सुमारे १ कोटी ३० लाखांचा व्यापार असून, त्यामध्ये अकोला जिल्ह्याचा सात टक्के वाटा असल्याची माहिती त्यांनी दिली.
शहरात घाऊक, किरकोळ बाजार अपेक्षित
शहरात घाऊक व किरकोळ बाजारपेठेची आवश्यकता असून, सायंकाळी ५:०० ते १०:०० वाजेपर्यंत बाजार उपक्रम सुरू ठेवण्याची व्यवस्था असावी, असे आंबेडकर यांनी सांगितले. शहरातून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याचा योग्य वापर करून रेल्वेमार्गाच्या पलीकडे बंधारा बांधल्यास तापमान कमी होण्यास मदत होईल तसेच पाणी संवर्धनासाठीही हा उत्तम उपाय ठरू शकतो, असे त्यांनी नमूद केले.