That's what a breakup | असलं कसलं ब्रेकअप
असलं कसलं ब्रेकअप

आनंद पार्क कॉलनीच्या आवारातलं ते गणेश मंदिर तिथल्या आजीआजोबांसाठी एक विसाव्याचं ठिकाण होतं. संध्याकाळी घटकाभर बसून गप्पाटप्पा केल्याखेरीज या ज्येष्ठांना करमत नसे. एरवी कायम खेळकर मूडमध्ये असणाऱ्या सुमाआजी आज मात्र विचारमग्न दिसत होत्या.
‘काय हो सुमनताई, आज गप्पगप्पशा?’ - खरात काकूंनी विचारलं.
‘नाही, इकडे येण्याआधी आमच्या श्रुतीबरोबर बोलणं झालं, त्याचा विचार करते.’
सुमन आजींची श्रुती सगळ्यांचीच लाडकी होती. चांगली एमए झाली, नोकरी करते, संध्याकाळी ‘नाटक-नाटक’ नावाच्या थिएटर ग्रुपमध्ये काम करते. दरवर्षी गणेशोत्सवात कॉलनीतल्या छोट्या मुलांचे कार्यक्रम बसवण्याचं काम श्रुतीचंच. थिएटर ग्रुपची ही दहा-बारा पोरं नाटकाला वाहून घेतलीत जशी. समीप त्याच ग्रुपमधला. दिसायला चांगला, शिक्षण-नोकरी सारं व्यवस्थित. श्रुतीनं जेव्हा सांगितलं, आम्ही लग्न करतोय, तेव्हा सगळ्यांनीच स्वागत केलं या बातमीचं. दोघांनाही साखरपुडा करायचा नव्हता. ‘कशाला उगीच खर्च? तेवढ्या पैशात नाटक उभं राहील’ असं त्यांचं म्हणणं! ते मात्र कुणी ऐकलं नाही आणि कॉलनीच्या हॉलमध्ये थाटात साखरपुडा केला. सुमन आजी सुखावल्या. तारीख ठरली. श्रुतीची आई आणि सुमन आजी तयारीला लागल्या. त्यांनी रुखवताचं नाव काढल्यावर श्रुती खो खो हसायला लागली. समीपला ‘जावईबापू’ म्हणायला मात्र तिनं सक्त विरोध केला.
आणि अचानक ही घोषणा, आमचं ब्रेकअप झालंय, मी नाही करत आहे समीपशी लग्न.’
‘अरे, असं कसं करत नाही लग्न? मग एवढ्या लोकांसमोर केलेल्या साखरपुड्याला काय अर्थ? नातेवाईक, कॉलनीतले लोक यांना काय सांगायचं?’
यावर श्रुतीनं शांतपणे उत्तर दिलं, ‘मी थोडंच सांगितलं होतं असा बॅण्डबाजा वाजवून समारंभ करायला. आमचं काही काही बाबतीत अजिबात पटत नाही असं लक्षात आलंय दोघांच्या. मग पुढे प्रॉब्लेम झाल्यावर घटस्फोट घेण्यापेक्षा आत्ताच कॅन्सल केलेलं बरं, नाही का?’
हा सगळा वृत्तांत मैत्रिणींना सांगून सुमन आजी जरा थांबल्या. पुन्हा म्हणाल्या, ‘अहो, मला हे कळलं त्याला आठवडा झाला. मी आपली ‘पोरीचा प्रेमभंग झालाय, तिला जपायला हवं’ या नादात. आपल्या तरुणपणी पोरी जीवबीवसुद्धा द्यायच्या हो असं काही घडलं तर. बघते तर ही नेहमीसारखीच दिवसभर जॉब आणि संध्याकाळी नाटकाच्या गडबडीत. हसणं खिदळणं नेहमीसारखंच. काल रात्री जवळ जवळ बारा वाजता घरी आली. मी जागीच होते. खिडकीतून पाहिलं तर समीपच्याच गाडीतून उतरली. म्हणून मग आता संध्याकाळी तिला गाठून विचारलं, ‘अगं मुली, ब्रेकअप झाला म्हणतेस अन् मग त्याच्याबरोबर का फिरतेस?’ तर जोरात हसायला लागली आणि म्हणते कशी,
‘माय डिअर आजी, ब्रेकअप झाला म्हणजे लग्न नाही करणार, मित्र आहेच की तो माझा पहिल्यापासून.’ सुमन आजीच्या बोलण्यात आश्चर्य मावत नव्हतं. काय हा थिल्लरपणा! चांगल्या घरातल्या मुली असं वागतात का? ही भावना त्यांना अस्वस्थ करत होती. पण तेवढ्यात देशपांड्यांच्या सरिताबाई म्हणाल्या, ‘किती सरळ निष्कपट वागणं आहे तुमच्या नातीचं. काही फसवाफसवी केली नाहीये तिनं तुम्हा लोकांशी. मी तर म्हणते, तुम्ही आजवर घरात ज्या मोकळेपणानं वागलात ना, त्याचंच हे फळ म्हणायचं.’
‘हो ना, पूर्वी बंधनंही जास्त होती आणि त्यामुळे लपवाछपवी पण जास्त. आणि मग मनाविरु द्ध नको त्या गोष्टी करायची सक्ती व्हायची. अशा किती मुली मन मारून संसार करत होत्या कोण जाणे!’
‘खरंच, ही तरुण पिढी आपल्यापेक्षा कितीतरी जास्त समंजस आहे, जबाबदारीनं वागणारी आहे असं वाटतंय आता. ही मुलं निर्णयही आपले आपण घेतात आणि निभावतातही स्वत:च्या हिमतीवर.’ असं जमलेल्या सगळ्याच आजी कंपनीला वाटून गेलं.

(लेखिका सुप्रसिद्ध डॉक्टर आणि मनाने तरुण राहणं साधलेल्या आजी आहेत.)


Web Title: That's what a breakup
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.