सरकारी शाळा होणार खासगीसारख्या चकाचक! सव्वा दोन कोटी आले

By अविनाश साबापुरे | Published: May 16, 2024 09:40 PM2024-05-16T21:40:53+5:302024-05-16T21:41:09+5:30

नव्या शिक्षण धोरणानुसार खेड्यापाड्यातील शाळांचा होतोय कायापालट

Government schools will be as shiny as private ones! | सरकारी शाळा होणार खासगीसारख्या चकाचक! सव्वा दोन कोटी आले

सरकारी शाळा होणार खासगीसारख्या चकाचक! सव्वा दोन कोटी आले

यवतमाळ: पोपडे पडलेल्या, रंग उडालेल्या भिंती... विस्तीर्ण जागा असली तरी मरगळलेले वातावरण.. हाच सरकारी शाळांचा चेहरा असतो. पण आता चित्र बदलणार आहे. जिल्ह्यातील ४० सरकारी शाळांचा कायापालट करण्यासाठी कोट्यवधीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून या शाळा शहरातील खासगी शाळांसारख्या चकाचक केल्या जाणार आहेत. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार, या शाळांमध्ये भौतिक आणि गुणवत्तेच्या अनुषंगाने बदल केले जात आहेत.

नव्या शिक्षण धोरणात शाळा कशी असावी याबाबत विस्तृत विवेचन करण्यात आले आहे. त्यासाठी पीएमश्री योजनेतून टप्प्या-टप्प्याने देशभरातील शाळांमध्ये बदल घडविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २६ शाळांची निवड करण्यात आली. या शाळांमध्ये नव्या अपेक्षित बदलानुसार बांधकामे करण्यासाठी एकंदर दोन कोटी २८ लाख ४० हजार ७५० रुपयांचा निधी देण्यात आला. दोन टप्प्यात मिळालेल्या या पैशांपैकी एक कोटी ३६ लाख २५ हजार ९१३ रुपयांचा खर्च ३१ मार्चपर्यंत झाला आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या २०, नगरपरिषदेच्या ५ तर समाज कल्याण विभागाच्या एका शाळेचा समावेश आहे.

कोणत्या तालुक्यात किती निधी?
तालुका : निधी
आर्णी : १६,५३,२५०
बाभूळगाव : २१,४३,२५०
दारव्हा : १३,९१,५००
दिग्रस : १७,५३,५००
घाटंजी : १६,२९,०००
कळंब : ८,२५,२५०
महागाव : ११,७३,२५०
मारेगाव : ८,३४,०००
नेर : ८,५७,२५०
पांढरकवडा : ८९,४,०००
पुसद : १९,७६,०००
राळेगाव : ९,०४,७५०
उमरखेड : ३०,२८,५००
वणी : ८,०५,५००
यवतमाळ : १६,३४,७५०
झरी : ७,६८,०००

पूर्वीच्या २६ आणि नंतर १४ शाळांना मंजुरी
पहिल्या टप्प्यात २६ शाळांची निवड पीएमश्री योजनेत करण्यात आली. त्यामध्ये आर्णी येथील न.प. उर्दू शाळा तसेच लोणी येथील जि.प. शाळा, बाभूळगाव येथील व तालुक्यातील राणी अमरावती येथील जि.प. शाळा, दारव्हाची न.प. शाळा व तालुक्यातील करजगावची जि.प. शाळा, दिग्रस न.प. शाळा व तालुक्यातील डेहणीची जि.प. शाळा, घाटंजी न.प. शाळा व तालुक्यातील सायतखर्डाची जि.प. शाळा, कळंबमधील जोडमोहाची जि.प. शाळा, महागावच्या मुडाणा येथील जि.प.शाळा, मारेगावच्या नवरगावची जि.प. शाळा, नेरमधील मांगलादेवीची जि.प. शाळा, पांढरकवडामधील पाटणबोरीची जि.प. शाळा, पुसद न.प. शाळा व तालुक्यातील आसारपेंड घाटोडीगावची समाज कल्याणची शाळा, राळेगावमधील नवी वस्ती व वाढोणाबाजारची जि.प. शाळा, उमरखेडमधील माजी शासकीय शाळा तसेच बिटरगाव, ढाणकी येथील जि.प. शाळा, वणीतील रासाची जि.प. शाळा, यवतमाळमधील लोहारा व हिवरीची जि.प. शाळा आणि झरीच्या मुकुटबनमधील जि.प. शाळेचा यात समावेश आहे. तर आता योजनेच्या दुसऱ्या टप्प्या १४ शाळांची निवड झाली. त्यामध्ये यवतमाळ न.प. कन्या शाळा, झरीतील अडेगावची जि.प. शाळा, राळेगाव येथील जि.प. कन्या शाळा, वरुड जहागीर जि.प. शाळा, पुसद न.प. शाळा तसेच बांसीची जि.प. शाळा, नेर न.प. मुलांची शाळा, मारेगावची जि.प. शाळा, महागावच्या तिवरंगची जि.प. शाळा, कळंब येथील जि.प. बेसिक स्कूल, घाटंजीमधील किन्ही किनारा येथील जि.प. शाळा, दिग्रसच्या आरंभीतील जि.प. शाळा, दारव्हा न.प. शाळा क्र. २, तसेच लाखखिंड जि.प. शाळेचा समावेश आहे.

Web Title: Government schools will be as shiny as private ones!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.