ईव्हीएम पेटविल्याचे चित्रीकरण व्हायरल करणाऱ्या चौघांवर गुन्हा; बागलवाडीतील घटना

By रवींद्र देशमुख | Published: May 10, 2024 07:53 AM2024-05-10T07:53:34+5:302024-05-10T07:53:47+5:30

मुख्य आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी

Crime against four who made viral the footage of setting EVM on fire | ईव्हीएम पेटविल्याचे चित्रीकरण व्हायरल करणाऱ्या चौघांवर गुन्हा; बागलवाडीतील घटना

ईव्हीएम पेटविल्याचे चित्रीकरण व्हायरल करणाऱ्या चौघांवर गुन्हा; बागलवाडीतील घटना

सोलापूर : बागलवाडी (ता. सांगोला) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मतदान केंद्र क्र. ८६ वरील तीन ईव्हीएम मशीनसह मतदान कक्ष पेटविल्याच्या घटनेचे मतदान केंद्राबाहेर खिडकीतून चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी सांगोला पोलिसांनी समाधान रावसाहेब वाघमोडे, राहुल सदाशिव चव्हाण व सुनील सदाशिव चव्हाण (सर्वजण रा. बागलवाडी) आणि एक अनोळखी अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, यापूर्वीच गुन्ह्यातील मुख्य आरोपी दादासाहेब मनोहर चळेकर (रा. बागलवाडी) यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० मेपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी दिल्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी सांगितले.

माढा लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार, ७ मे रोजी शांततेत मतदान चालू असताना बागलवाडीतील दादासाहेब मनोहर चळेकर या मतदाराने बूथ क्रमांक ८६ वर येऊन दुपारी १२:४८ च्या सुमारास मतदानाचा हक्क बजावताना खिशात आणलेल्या बाटलीतील द्रव टाकून मतदान केंद्रातील तीन ईव्हीएम मशीनसह मतदान कक्ष पेटवून दिले. या घटनेत ९० हजार रुपयांचे नुकसान झाले.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले

सोशल मीडियावर प्रसारित झालेले चित्रीकरण व मतदान केंद्रातील परिस्थितीचे अवलोकन करून मतदान केंद्रामध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता मतदान केंद्रामध्ये दादासाहेब चळेकर यांनी येऊन मतदान केल्यानंतर टेबलवर ठेवलेल्या तीन ईव्हीएम पेटविल्याचे अनोळखी व्यक्तीने मतदान केंद्राच्या खिडकीच्या बाहेर उभे राहून स्वतःच्या खासगी मोबाइलमध्ये, तर समाधान रावसाहेब वाघमोडे, राहुल सदाशिव चव्हाण व सुनील सदाशिव चव्हाण (सर्व रा. बागलवाडी) यांनी स्वतःच्या मोबाइलमध्ये मतदान केंद्रातील परिस्थितीचे अनाधिकाराने चित्रीकरण केले. याबाबत, पोलिस नाईक मोहसीन इकबाल सय्यद यांनी फिर्याद दिली आहे.

Web Title: Crime against four who made viral the footage of setting EVM on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.