१७ रुग्णांना मारले; नर्सला ७०० वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 07:56 AM2024-05-09T07:56:16+5:302024-05-09T07:56:37+5:30

डॉक्टर, नर्स आदी वैद्यकीय पेशातील व्यक्तींना देवदूत मानलं जातं. मरणाऱ्या किंवा यातनांनी त्रस्त झालेल्या लोकांना एकप्रकारे ते जीवदानच देत ...

17 patients killed; Nurse sentenced to 700 years | १७ रुग्णांना मारले; नर्सला ७०० वर्षांची शिक्षा

१७ रुग्णांना मारले; नर्सला ७०० वर्षांची शिक्षा

डॉक्टर, नर्स आदी वैद्यकीय पेशातील व्यक्तींना देवदूत मानलं जातं. मरणाऱ्या किंवा यातनांनी त्रस्त झालेल्या लोकांना एकप्रकारे ते जीवदानच देत असतात. सध्या इस्त्रायल आणि हमास तसंच रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धातही अनेक जखमींवर उपचार करून डॉक्टरांनी जीवदान दिलं आहे. यात गर्भवती महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. 

या दोन्ही युद्धांमध्ये आजवर महिला आणि मुलांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाला आहे आणि त्यांचं जखमी होण्याचं प्रमाणही खूपच जास्त आहे. मात्र या दोन्ही युद्धांमध्ये, त्या-त्या ठिकाणी अनेक डॉक्टर आणि नर्स जीवावर उदार होऊन मदत आणि उपचार करीत आहेत. त्यांनी अनेक गर्भवती स्त्रियांना आणि त्यांच्या होणाऱ्या बाळालाही वाचवलं आहे. गाझा पट्टीत नुकत्याच झालेल्या एका घटनेत तर बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पावलेल्या एका गर्भवती महिलेच्या पोटातून जिवंत बाळ काढण्याची किमया डॉक्टर आणि त्यांना मदत करणाऱ्या नर्सनं नुकतीच केली. त्यामुळेच वैद्यकीय व्यवसायातील लोकांना आजही मानाचं स्थान आहे. काही व्यक्ती मात्र याला अपवाद असतात. 

असाच एक अपवाद म्हणजे अमेरिकेच्या पेनसिल्वानिया येथील नर्स हीथर प्रेसडी. अमेरिकेच्या न्यायालयानं तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावताना वेगवेगळ्या गुन्ह्यांत तब्बल ७०० वर्षांची शिक्षा दिली आहे. असं केलं तरी काय तिनं की, तिला एवढी मोठी शिक्षा मिळावी? वैद्यकीय व्यवसाय आणि नर्स या पेशाला काळिमा फासताना हीथरनं तब्बल १७ जणांचा जीव घेतला, तर इतरही आणखी काही जणांना मारण्याचा प्रयत्न केला. दैव बलवत्तर म्हणून त्यातील काही जण बचावले. 

४१ वर्षांच्या हीथरनं २०२० ते २०२३ या काळात वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये काम करताना २९ रुग्णांना इन्सुलीनचे ओव्हरडोस दिले. तेही काहीही कारण नसताना. त्यांना ना डायबेटिस होता, ना तशी शक्यता होती, ना इतर कुठली गंभीर कारणं; पण लहरी हीथरनं केवळ असुरी आनंद मिळवण्यासाठी या लोकांना मुद्दाम इन्सुलीनचे डोस दिले आणि त्यांना ठार मारलं. या रुग्णांमध्ये ४३ वर्षांपासून ते १०४ वर्षे वयापर्यंतच्या विविध वयोगटातील स्त्री-पुरुषांचा समावेश होता. हॉस्पिटलमध्ये नाईट ड्यूटीवर असताना तिनं या रुग्णांना इन्सुलीनचे ओव्हरडोस देऊन ठार मारलं. 

हीथर असं काही करते आहे किंवा करेल, असं अगोदर कुणाच्याा लक्षात आलं नाही; पण २०२३मध्ये हीथरनं दोन जणांना इन्सुलीनचा ओव्हरडोस देऊन मारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. या चौकशीत हीथरनं आणखीही बऱ्याच लोकांना ठार मारल्याचं लक्षात आलं. हीथर अगोदर अशी नव्हती. रुग्णांची ती व्यवस्थित काळजी घ्यायची, त्यांची देखभाल करायची, त्यांच्यावर नीट उपचार करायची, पण काही कालावधीनंतर मात्र तिच्या मनात रुग्णांविषयी तीव्र घृणा उत्पन्न झाली. या रुग्णांना खाऊ की गिळू, असं तिला वाटायला लागलं. त्यांना त्रास देण्यात किंवा त्यांना संपवण्यात तिला एक विकृत आनंद मिळायला लागला आणि अतिशय शांत डोक्यानं तिनं एकेका पेशंटला संपवायला सुरुवात केली. ती ज्या पद्धतीनं रुग्णांना मारत होती, ते जर लवकर लक्षात आलं नसतं, तर अजून बऱ्याच रुग्णांचा जीव गेला असता. 

रुग्णांच्या नातेवाइकांनी न्यायालयात सांगितलं, हीथर रुग्णालयातील आजारी लोकांशी आधी चांगले संबंध तयार करायची, त्यांचा विश्वास बसला की मग ती त्यांचा ‘काटा’ काढायची! नर्सच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी सांगितलं, खरं तर हीथर रुग्णांचा अतिशय तिरस्कार करायची, त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाइकांच्या अपरोक्ष ती त्यांना शिव्यांची लाखोलीही व्हायची. 
हीथरनं आपल्या आईलाही अनेकदा टेक्स्ट मेसेजेस केले. त्यात ती म्हणायची, हे पेशंट म्हणजे एकदम बोगस आहेत. ते जगायच्या लायकीचे नाहीत. ते कशासाठी जिवंत आहेत, हेच मला कळत नाही. स्वत:लाही त्रास करवून घेतात आणि इतरांनाही त्रास देतात. एखाद दिवस मीच त्यांना चांगली अद्दल घडवीन किंवा धडा शिकवीन! हीथर आजारी नाही, ती वेडीही नाही; पण ती माणूसघाणी आहे, असा दावा करताना एका व्यक्तीनं सांगितलं, माझ्या वडिलांना हीथरनं ठार केलं, त्या दिवशी तिच्या रूपानं मी पहिल्यांदा सैतान पाहिला!

रुग्णांना मारण्यासाठी इन्सुलीनचा वापर
इन्सुलीनच्या ओव्हरडोसमुळे हृदयाचे ठोके जलद गतीनं पडायला लागतात. नंतर हार्ट अटॅकनं त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. रुग्णांना मारण्यासाठी हीथरनं याच पद्धतीचा वापर केला. हीथरविरुद्ध सर्व पुरावे सादर केल्यानंतर आणि ते सिद्ध झाल्यानंतर न्यायालयानं तिला वेगवेगळ्या गुन्ह्यांत ७०० वर्षांची शिक्षा सुनावली. पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर तिचा परवानाही रद्द करण्यात आला होता.

Web Title: 17 patients killed; Nurse sentenced to 700 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.