संकटसमयी ‘बाहेर’ पडण्याचा ‘खात्री’चा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 07:59 AM2024-05-09T07:59:05+5:302024-05-09T07:59:15+5:30

माझ्या कॅन्सरच्या उपचारात अनेक टप्पे होते. आधी केमोथेरपी, त्यानंतर शस्त्रक्रिया, मग पुन्हा केमोच्या उरलेल्या सायकल्स आणि त्यानंतर रेडिएशन. प्रत्येक उपचारांचा हा प्रवास खूप काळ, जवळजवळ दहा-अकरा महिने चालणारा होता.

A 'sure' way to 'get out' of crisis | संकटसमयी ‘बाहेर’ पडण्याचा ‘खात्री’चा मार्ग

संकटसमयी ‘बाहेर’ पडण्याचा ‘खात्री’चा मार्ग

स्मृती आणि अनुभव यामध्ये फारसा फरक नसतो, असे भारतीय योगशास्त्र मानते. एकदा केलेल्या योग्य कृतीचे स्पष्टपणे चित्रण करणे हे पुन्हा त्या अनुभवातून जाण्यासारखेच असते. थोडक्यात, भूतकाळात दिलेला योग्य प्रतिसाद किंवा योग्य कृतीचे चित्रण आपण पुन्हा-पुन्हा आठवत राहिलो तर योग्य कृती पुन्हा-पुन्हा केल्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. याचा एखादा जरी अनुभव घेतला तरी या साधनेची महत्ता आपल्याला पटायला लागते. भूतकाळातील चुकीच्या अनुभवांकडे वारंवार गेल्यामुळे आत्मविश्वास ढासळत जातो. तो सावरण्यासाठी चित्रणाचा सराव नक्की मदत करतो. या साधनेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपले जे काही ध्येय आपण मनाशी ठरवले आहे त्याचे टप्पे पाडणे. 

माझ्या कॅन्सरच्या उपचारात अनेक टप्पे होते. आधी केमोथेरपी, त्यानंतर शस्त्रक्रिया, मग पुन्हा केमोच्या उरलेल्या सायकल्स आणि त्यानंतर रेडिएशन. प्रत्येक उपचारांचा हा प्रवास खूप काळ, जवळजवळ दहा-अकरा महिने चालणारा होता. शिवाय त्या प्रवासात अनिश्चितता एवढी होती की, अंतिमतः काय घडेल, याची कल्पना आणि विचार करणे शक्यच नव्हते. भविष्यकाळ अगदी धूसर होता. अशा वेळी माझ्यापुढे एकच पर्याय होता आणि तो म्हणजे प्रत्येक टप्प्याचे चित्रण करणे किंवा फक्त त्याचा विचार करणे. 

One step at a time हे गिर्यारोहकांचे फार लाडके तत्त्व आहे. ते आपल्या आयुष्यालापण उत्तम लागू होते. एकावेळी एका गोष्टीवर लक्ष एकाग्र केल्याने आपण त्या गोष्टीला पुरेपूर न्याय देऊ शकतो. त्यामुळे समोर असलेल्या आव्हानाचे लहान-लहान टप्पे पाडणे आणि प्रत्येक टप्प्याचे चित्रण करणे हे उत्तम. चित्रणात जेवढे तपशील भरता येतील तेवढा त्याचा फायदा अधिक! मी केमोथेरपीची जी चित्रणे केली आहेत त्यात मी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरांना कसे अभिवादन करणार इथपासून तर जाताना मी कपडे कोणते घालून  जाणार इतक्या लहानसहान बाबींचा तपशीलवर विचार आणि चित्रण करीत होते! आपल्याकडून प्रयत्नांमध्ये कसूर राहायला नको, यासाठी मी पुरेपूर काम त्या काळात केले आणि या सगळ्या प्रयत्नांनी मला मोठा आधार दिला!

Web Title: A 'sure' way to 'get out' of crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.