धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा

By संजय तिपाले | Published: May 9, 2024 08:48 PM2024-05-09T20:48:48+5:302024-05-09T20:48:58+5:30

सर्जन, फिजिशियन नसल्याने उपचारात हलगर्जी

Shocking! Two mothers lost their lives in four days, aheri | धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा

धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा

गडचिरोली :  अवघ्या चार दिवसांच्या अंतराने येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या  दोन मातांचा   मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ९ मे रोजी उघडकीस आली. या रुग्णालयात सर्जन व फिजिशियन उपलब्ध नव्हते, त्यामुळे महिलांवर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत, अशी प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे दुर्गम व मागास भागात आरोग्यसेवेचा कसा बोजवारा उडालेला आहे, हे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. 
 
सरिता संतोष तोटावार (२४,रा.चिंचगुंडी ता. अहेरी) व नागूबाई जितेंद्र कोडापे (२३,रा.वडलापेठ ता. अहेरी) अशी मृत मातांची नावे आहेत. दोघींचीही नवजात बालके सुखरुप आहेत. सरिता ही प्रसववेदना जाणूव लागल्याने ३ मे रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. तिची डॉक्टरांनी तपासणी केली असता तिला हृदयरोग असल्याचे निदान झाले. त्यानंतर ४ मे रोजी ती कुटुंबासोबत घरी गेली व घरीच तिची प्रसूती झाली. मात्र, प्रसूतीनंतर प्रकृती खालावल्याने तिला नातेवाईकांनी ५ रोजी पुन्हा रुग्णालयात दाखल केले असता प्रकृती खालावलेली होती, त्यांनाही जिल्हा रुग्णालयात रेफर केले, पण गडचिरोलीत पोहोचण्यापूर्वीच त्यांनी प्राण सोडले. 

नागूबाई कोडापे ही २३ एप्रिलला उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. त्याच दिवशी प्रसूती झाली. २५ रोजी माता व बाळ सुरक्षित असल्याने सुटी दिली. मात्र, १३ दिवसांनी अचानकच नागूबाईची प्रकृती खालावली. त्यामुळे ती उपजिल्हा रुग्णालयात भरती झाली. उपचारासाठी फिजिशियन व सर्जन उपलब्ध नसल्याने तिला दुपारी ४ वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली.  

दोन्ही चिमुकले मातृप्रेमाला पारखे
सरिता तोटावार व नागूबाई कोडापे या दोघींचीही दुसरी प्रसूती होती. दोघींनीही मुलाला जन्म दिला होता. चार दिवसांच्या अंतराने दोघींचाही मृत्यू झाला. त्यामुळे निरागस चिमुकले मातृप्रेमाला पारखे झाले आहेत.

दोन्ही प्रकरणांत उपचारासाठी फिजिशयन गरजेचे होते. या रुग्णालयात फिजिशियन उपलब्ध नव्हते. हे पद रिक्त असल्याने त्या दोघींनाही रेफर केल्याखेरीज पर्याय नव्हता. रिक्त पदे भरावीत, यासाठी प्रयत्न सुरु आहे.
- डॉ. कन्ना मडावी अधीक्षक , उपजिल्हा रुग्णालय, अहेरी

Web Title: Shocking! Two mothers lost their lives in four days, aheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.