अंत्योदय रेशन कार्डधारकांना मिळणार तीन किलो साखर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 06:23 PM2024-05-10T18:23:58+5:302024-05-10T18:24:55+5:30

गरीबांना दिलासा : जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचे नियतन मंजूर

Antyodaya ration card holders will get three kg of sugar | अंत्योदय रेशन कार्डधारकांना मिळणार तीन किलो साखर

Antyodaya ration card holders will get three kg of sugar

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
मे महिन्याच्या रेशनसोबत जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांची तीन किलो साखर अंत्योदय लाभार्थ्यांना दिली जाणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याने साखरेची उचल करावी, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.

शासनामार्फत केवळ अंत्योदय लाभार्थ्यांना स्वस्त दरात साखर उपलब्ध करून दिली जाते. उर्वरित लाभार्थ्यांना केवळ गहू व तांदूळ दिले जाते. मागील सहा महिन्यांपासून अंत्योदय लाभार्थ्यांना नियमित साखरेचे वितरण केले जात नसल्याचे दिसून येत आहे. २०२३ या वर्षात जवळपास चार महिने साखर मिळाली नव्हती. जानेवारी महिन्यात एकाच वेळी चार महिन्यांची साखर देण्यात आली. त्यानंतर पुन्हा साखरेचे वितरण बंद पडले. आता पुन्हा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले. मे महिन्यात होणाऱ्या धान्य वितरणासोबत साखरही मिळणार आहे. एप्रिल हा एक महिना पुन्हा शिल्लक आहे. शासन नियमितपणे धान्य देत असताना साखर का देत नाही, असा प्रश्न लाभार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे. काही दिवसांनंतर साखरेचे वितरण बंद करणार की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अंत्योदय लाभार्थी वगळता इतर कार्डधारकांना साखर मिळत नाही. केवळ गहू व तांदूळ मोफत मिळते.


गहू, तांदूळ नियमित मिळते, साखर का नाही?
• प्रत्येक कार्डधारकाला शासनातर्फे गहू व तांदूळ मोफत उपलब्ध करून दिले जात आहे. गहू व तांदूळ जर मोफत उपलब्ध होत असेल तर एका कार्डमागे एक किलो साखर का दिली जात नाही, असा प्रश्न आहे.

• शासनाकडून फक्त अंत्योदय लाभार्थ्यांना साखरेचे वितरण केले जाते. इतर कार्डधारकांना साखर मिळत नाही. सध्या अनियमित मिळणारी साखर लक्षात घेता शासन बंद करणार तर नाही ना, अशी शंका आहे.


पावतीमध्ये दिसणार साखरेचा उल्लेख
• ग्रामीण भागातील अनेक दुकानदार साखर मिळाली नाही, असे सांगून लाभार्थ्यांची फसवणूक करतात. संबंधित लाभार्थ्याला कोणत्या वस्तू मिळणार आहेत, याची नोंद दुकानदारामार्फत देण्यात आलेल्या पावतीमध्ये असते. दुकानदार जर साखर देत नसेल तर पावती तपासावी. पावतीमध्ये जर साखरेचा उल्लेख असेल तर दुकानदार जाणूनबूजन साखर देत नसल्याचे स्पष्ट होते. याबाबतची तक्रार तालुकास्तरावरील पुरवठा विभागामध्ये करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


 

Web Title: Antyodaya ration card holders will get three kg of sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.